स्टेअरिंग नेमके कुणाच्या हाती? गूढ कायम; नौदलाच्या स्पीड बोटीवरील सहापैकी चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 05:58 IST2024-12-20T05:58:06+5:302024-12-20T05:58:25+5:30
स्पीड बोट नेमकी कशासाठी फेऱ्या मारत होती? ओईएमचे कर्मचारी का आलेले? यासह नीलकमल बोटीसंबंधितही सर्व तपशील मेरीटाइम बोर्डाकडून मागविण्यात आला.

स्टेअरिंग नेमके कुणाच्या हाती? गूढ कायम; नौदलाच्या स्पीड बोटीवरील सहापैकी चौघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नीलकमल फेरीबोटीला धडक देणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोटीचे स्टेअरिंग नेमके कुणाच्या हाती होते? याचे गूढ घटनेच्या दुसऱ्या दिवशीही कायम आहे. स्पीड बोटीवरील सहा जणांपैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी असून त्यांच्यावर मुंबई आणि उरणमध्ये उपचार सुरू आहेत.
गेटवेहून एलिफंटा लेणीच्या दिशेने निघालेल्या नीलकमल फेरी बोटीला नौदलाची स्पीड बोट धडकल्याने अपघात झाला. भुचर बेटाजवळ बुधवारी दुपारी तीन वाजून ५५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली.
भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांनी स्थानिक मासेमारी बोटींच्या मदतीने बचावकार्य सुरू करत ११३ जणांना पाण्याबाहेर काढले. यात नौदलाच्या एका जवानासह १४ जणांचा मृत्यू झाला तर एकाचा शोध सुरू आहे. कुलाबा पोलिसांनी स्पीड बोटीवरील चालकासह संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. तसेच आतापर्यंत ११ जणांचे जबाब नोंदवले असून नीलकमल बोटीचा चालक, बोट मालक यांचा जबाब नोंदविण्यासंबंधित तसेच बोटीची कागदपत्रेही मागण्यात आली आहेत.
पोलिसांनी दुर्घटनेतील जखमी आणि मृतांचे नातेवाईक, बोटीवरील कर्मचारी यांच्याकडे चौकशी करून त्यांचे जबाब नोंद करत आहेत. स्पीड बोटीवर एकूण सहा जणांपैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक नौदल अधिकारी आणि तीन ओईएम कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जखमी नौदल अधिकाऱ्यांवर अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी तपास पथक जबाब नोंदविण्यासाठी गेले असता त्यांची प्रकृती गंभीर असल्याने जबाब नोंदवता आला नाही. ओईएमचा एक कर्मचारी मोरा येथील नौदल रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या जबाबातून धडकेमागचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
स्पीड बोटीच्या अहवालाची प्रतीक्षा
स्पीड बोट नेमकी कशासाठी फेऱ्या मारत होती? ओईएमचे कर्मचारी का आलेले? यासह नीलकमल बोटीसंबंधितही सर्व तपशील मेरीटाइम बोर्डाकडून मागविण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. नौदलाच्या स्पीड बोटीवर नवीन इंजिन बसविण्यात आले होते. या इंजिनाची चाचणी घेत असताना नौदलाच्या स्पीड बोट चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीत समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांना नौदलाच्या बोटीच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे.
पाच परदेशी नागरिकही सुखरूप
दुर्घटनेतून वाचलेल्या व्यक्तींमध्ये पाच परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. यात एक कॅनडा, दोन जर्मनी आणि दोन यूकेचे रहिवासी आहेत.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी?
बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. तसेच लाइफ जॅकेटदेखील देण्यात आले नव्हते. याबाबतची अधिक माहिती मेरीटाइम बोर्डाकडून मागवण्यात आली आहे. त्यानुसार चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी नमूद केले.