लाखोंचे सिम्युलेटर नेमके वापरते कोण? रस्ता सुरक्षेच्या निधीतून खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:38 IST2025-07-16T09:37:46+5:302025-07-16T09:38:05+5:30
सिम्युलेटर बंधनकारक नसल्याचा आरटीओचा दावा

लाखोंचे सिम्युलेटर नेमके वापरते कोण? रस्ता सुरक्षेच्या निधीतून खरेदी
- महेश कोले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) ड्रायव्हिंग टेस्ट देणाऱ्या उमेदवारांचे कौशल्य वाढविण्यासाठी २०२२ पासून ड्रायव्हिंग सिम्युलेटर सुरू केले आहेत. मात्र मुंबईतील एकाही आरटीओ कार्यालयामध्ये उमेदवारांना त्याचा वापर करू दिला जात नसल्याचे ‘लोकमत’ला आढळले आहे. सराव करण्यासाठी ड्रायव्हिंग सिम्युलेटरचा वापर करण्याची परवानगी मागितल्यानंतर वेगवेगळी कारणे दिली जातात. सरावासाठी लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या मशीन पडून आहेत.
मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरीवली अशा विविध आरटीओमध्ये सिम्युलेटर उपलब्ध करून दिले आहेत. चारही आरटीओ कार्यालयांमध्ये पक्क्या लायसन्सची मुख्य परीक्षा देण्याअगोदर सरावासाठी उपलब्ध करून दिलेल्या सिम्युलेटरचा वापर होत नाही. त्यांच्या वापरण्याबाबत विचारणा केल्यानंतर ते बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षेच्या नावाखाली घेतलेल्या या मशीन धूळ खात पडल्या आहेत, असे ‘लोकमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीला आढळले.
ताडदेव आरटीओमध्ये लर्निंग टेस्ट विभागामध्ये चारचाकी आणि दुचाकीचे सिम्युलेटर आहे. ते वापरण्याची परवानगी मागितली, मात्र मशीन बंद असून, वापरता येणार नाहीत, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचे कारण विचारले असता, ते आम्हाला माहिती नसून वरिष्ठांकडे चौकशी करण्यास त्यांनी सांगितले.
वडाळा आरटीओत संगणकीय शिकाऊ लायसन्स चाचणी विभागात सिम्युलेटरचा ठेवले आहेत. ते वापरासाठी मागितले असता. फक्त शिकाऊ टेस्ट देणाऱ्यांसाठी त्या असल्याचे सांगण्यात आले. बोरीवली आरटीओमध्ये असलेली मशीन बंद असल्याचे निर्दशनास आले. अंधेरी आरटीओमध्ये असलेल्या मशीनदेखील बंद असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.
ताडदेव कार्यालयात दोन सिम्युलेटरपैकी एका सिम्युलेटरच्या देखभालीसाठी कार्यवाही सुरू आहे. एक मशीन सुरू आहे. या मशीन टेस्टसाठी बंधनकारक नसून केवळ ट्रेनिंगसाठी आहेत.
भरत कळसकर,
अतिरिक्त आयुक्त, परिवहन विभाग