Join us  

“सुशांत प्रकरणात ठाकरे कुटुंबाच्या बदनामीचं कारस्थान कोण करतंय? याचा लवकरच स्फोट होईल”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 3:55 PM

कशापद्धतीने राजकारण होत आहे आणि कोणत्या थराला जाऊन केले जात आहे. याचा लवकरच स्फोट होईल, खुलासा करण्यात येईल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.

ठळक मुद्देहे संपूर्ण कारस्थान ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केले जात आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण बिहारविरुद्ध महाराष्ट्र रंगवलं जात आहे. इथलेच राजकीय नेते पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण आलं आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यात काही जणांकडून यात मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्याचा प्रकार केला आहे.यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे कोण लोक आहेत, याची माहिती आपल्याकडे आहे याचा लवकरच स्फोट होईल. सुशांतच्या प्रकरणात राजकारण होत आहे. पडद्यामागून पटकथा लिहिली जात आहे. हे राजकारण दळभ्रदी असून प्रतिमा मलीन करण्याचा डाव आहे. ज्यापद्धतीने आदित्य ठाकरेंच्या दिशेने आरोपांच्या फैरी झाडत आहात त्यांनी लक्षात ठेवा, यात बदनाम महाराष्ट्राला करत आहात असं त्यांनी म्हटलं आहे. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

तसेच हे संपूर्ण कारस्थान ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केले जात आहे. महाराष्ट्राविरोधात कोण कारस्थान करत आहे. राजकारण करत आहे, कशापद्धतीने राजकारण होत आहे आणि कोणत्या थराला जाऊन केले जात आहे. याचा लवकरच स्फोट होईल, खुलासा करण्यात येईल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.

दरम्यान, हे प्रकरण बिहारविरुद्ध महाराष्ट्र रंगवलं जात आहे. सीबीआयकडे हे प्रकरण सोपवावं असं म्हणतात त्यांनी सीबीआय कशाला ट्रम्प यांच्या सीआयएकडे द्यावं, पुतीन यांच्याकडे द्यावं, युनोमध्ये प्रश्न उठवा, हा सर्व मुर्खपणा सुरु आहे. मुंबई पोलीस सक्षम आहेत, जगाचा मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे. इथलेच राजकीय नेते पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत. महाराष्ट्राशी इतकी बेईमानी याआधी कुणी केली नव्हती असा घणाघात राऊत यांनी विरोधकांवर केला आहे.

त्याचसोबतच महाराष्ट्रापेक्षा बिहारचे पोलीस बरे असं काही लोक म्हणतात, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करतात तेव्हा या कारस्थानाची मूळ कुठल्या चिखलात रुतलेली आहेत हे स्पष्ट दिसते. मुंबई पोलीस ही व्यक्ती नाही तर संस्था आहे. अशाप्रकारे संस्थेचे खच्चीकरण करणं बरोबर नाही असं सांगत राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतआदित्य ठाकरेसंजय राऊत