Join us  

मराठीचा निर्णय घेताना सरकारने आणखी एक भानगड करून ठेवलीय- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 7:50 AM

शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे.

मुंबई : राज्यातील सर्वच दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत असतील, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. यावर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचे श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचे असल्याचे सांगत ते लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा सरकारला दिला आहे. शिवाय, मराठी सोबत इतर भाषांना परवानगी देत सरकारने आणखी एक भानगड करून ठेवल्याचेही राज यांनी म्हटले आहे. 

मराठी पाट्यांबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करतानाच आता कच खाऊ नका, या निर्णयाची नीट अंमलबजावणी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. मात्र, या निर्णयाचे श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचे आहे. ते लाटण्याचा आचरटपणा कुणीही करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरे तर आंदोलन करावे लागूच नये, परंतु २००८ आणि २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलने केली.

शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच, असे राज ठाकरे यांनी पत्रकात  म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी जारी केलेल्या याच पत्रकात पुढे म्हटले आहे की, हा निर्णय घेताना सरकारने आणखी एक भानगड करून ठेवली आहे. मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेमनसे