मित्राला मदत करताना ‘ताे’ सापडला सायबर भामट्याच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:33 IST2025-10-16T12:33:44+5:302025-10-16T12:33:50+5:30
तक्रारदार रामलखन हे सांताक्रुझ पूर्वेला राहतात. त्यांचे मित्र मनीष निषाद हे गेल्या आठ वर्षांपासून दुबईत पेंटिंगचे काम करतात.

मित्राला मदत करताना ‘ताे’ सापडला सायबर भामट्याच्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असतानाच, आता मदतीचे बनावट संदेश पाठवून गंडा घालण्याच्या प्रकारात वाढ झाली झाली असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सांताक्रुझ पूर्व परिसरातील एका सुतार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला फेसबुकवरून बनावट मेसेज पाठवून त्याचा मित्र अडचणीत असल्याचे सांगत चार लाख ५९ हजार ९९९ रुपये उकळले. या प्रकरणी व्यवसायाने सुतार असलेले रामलखन निषाद यांच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
तक्रारदार रामलखन हे सांताक्रुझ पूर्वेला राहतात. त्यांचे मित्र मनीष निषाद हे गेल्या आठ वर्षांपासून दुबईत पेंटिंगचे काम करतात. फोन आणि मेसेजवरून दोघांचा नेहमी संपर्क असतो. मात्र, ‘मनीष ओकी’ या फेसबुक अकाउंटवरून रामलखन यांना मेसेज आला की, ‘मी तुला चार लाख ८० हजार रुपये पाठवत आहे, ते मला गावाला आल्यावर परत दे. मी सुट्टीवर येतोय.’ त्यानंतर, दुसऱ्या मेसेजमध्ये लिहिले होते की, ‘माझ्या पासपोर्टमध्ये चूक झाली असून, मला क्राइम ब्रँचने पकडले आहे,’ तसेच किरण नावाच्या एजंटचा मोबाइल नंबरही दिला.
‘पैसे न दिल्यास ५ वर्षांची शिक्षा’
रामलखन यांनी त्या नंबरवर संपर्क साधला. त्यावेळी ‘तुमच्या मित्राच्या पासपोर्टचे मी नूतनीकरण केले आहे, पण त्याने माझे ७० हजार रुपये दिले नाहीत, म्हणून क्राइम ब्रँचने त्याला अटक केली आहे. पैसे न दिल्यास त्याला पाच वर्षांची शिक्षा होईल,’ असे फोनवरील व्यक्तीने सांगितले.
१३ वेळा व्यवहार
रामलखन यांनी त्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, विविध व्यवहारांद्वारे १३ वेळा मिळून चार लाख ५९ हजार ९९९ रुपये पाठविले. मात्र, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.