अल्पसंख्याक मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे? कुर्ला भागातील समस्यांमुळे नागरिकांमध्ये वाढती नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:32 IST2025-12-28T13:31:30+5:302025-12-28T13:32:03+5:30
शिंदेसेना व भाजपमधील जागा वाटपाचा तिढा कायम असून, शिंदेसेनेने येथील जागांवर केलेला दावा कसा सुटतो? यावर भाजपची रणनीती ठरणार आहे.

अल्पसंख्याक मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे? कुर्ला भागातील समस्यांमुळे नागरिकांमध्ये वाढती नाराजी
सचिन लुंगसे -
मुंबई : अल्पसंख्याक समाजाचे प्राबल्य असलेल्या कुर्ला भागात काँग्रेससोबत उद्धवसेनेची चांगली संघटनात्मक ताकद आहे. त्यात उद्धवसेनेला मनसेची साथ मिळाल्याने त्यात भर पडणार आहे. शिंदेसेना व भाजपमधील जागा वाटपाचा तिढा कायम असून, शिंदेसेनेने येथील जागांवर केलेला दावा कसा सुटतो? यावर भाजपची रणनीती ठरणार आहे.
२०१७ च्या पालिका निवडणुकीत येथून भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले होते. तर, काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. विजयाची ही घोडदौड २०२६ मध्येही कायम राहते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे मंगेश कुडाळकर यांनी बाजी मारली होती. उद्धवसेनेच्या उमेदवार प्रविणा मोरजकर पराभूत झाल्या. २०१७ मध्ये मोरजकर १६९ प्रभागातून विजयी झाल्या होत्या. १४९ मधून भाजपचे सुषम सावंत तर १५९ मधून राजेश फुलवारिया विजयी झाले होते. कुर्ल्यातील काही भागांत मलिक कुटुंबांचे वर्चस्व असून, १६८ मधून राष्ट्रवादीच्या डॉ. सईदा खान विजयी झाल्या होत्या.
पश्चिमेकडे विकास कधी?
कलिनामधील प्रभागातून पराभूत झालेले सुधीर खातू यावेळी उद्धवसेनेकडून कुर्ल्यातील प्रभागातून इच्छुक आहेत. प्रविणा मोरजकर, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या सईदा खान, कप्तान मलिक व सुषम सांवत (भाजप) या माजी नगरसेवकांची ना चर्चेत आहेत. कुर्ला पूर्वेकडील परिसर बऱ्यापैकी विकसित झाला आहे. मात्र, पश्चिमेकडे विकासाचा अभाव आहे. रस्ते, झोपड्या, अस्वच्छता अशा समस्यांनी हा भाग ग्रासलेला आहे. २०१७ नंतर नगरसेवकांनी केले काय?, असा नागरिकांचा सवाल आहे.
२०१७ पालिका निवडणूक
प्रभाग विजयी मते
१४९ सुषम सावंत ५,९२७
(भाजप)
१५१ राजेश फुलवारिया ९,९७२
(भाजप)
१६७ दिलशादबानो आजमी ८,८७४
(काँग्रेस)
१६८ सईदा खान ७,८९६
(राष्ट्रवादी काँग्रेस)
१६९ प्रवीणा मोरजकर १०,२९९
(शिवसेना)
१७० कप्तान मलिक ७,३४८
(राष्ट्रवादी काँग्रेस)
१७१ सनवी तांडेल ७,७२०
(शिवसेना)
प्रभाग पराभूत मते
१४९ संजय कदम ३,८०८
(शिवसेना)
१५१ गौतम साबळे ५,२९५
(काँग्रेस)
१६७ रकमाना शेख ४७७७
(सपा)
१६८ अनुराधा पेडणेकर ६,३९३
(शिवसेना)
१६९ श्रीकांत भिसे ५,५११
(भाजप)
१७० दर्शना शिंदे ३,२१४
(शिवसेना)
१७१ अफसाना खान ४,४२८
(एमआयएम)
प्रभाग आताचे मतदार
१४९ ४९,४८०
१५१ ५२,१६१
१६७ ४५,५४०
१६८ ५०,५४८
१६९ ५२,०९२
१७० ३८,७८४
१७१ ४६,७०१