Join us

'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 21:51 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. तिसऱ्या दिवशीही पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. मुंबई पोलिसांनी तिसऱ्या दिवशीही आंदोलनाला परवानगी दिली. रोजच्या परवानगीवरुन जरांगे पाटील यांनी मुंबई पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांना सवाल केले. 

BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी देताना मुंबई पोलिसांनी 'रोज अर्ज' करण्याची अट घातली आहे. या अटीमुळे आंदोलकांवरील प्रशासकीय ताण वाढत आहे. यावरुन मनोज जरांगे पाटील यांचे वकील आशिषराजे गायकवाड यांनी मुंबंई पोलिसांकडे अर्ज दाखल केला आहे, यामध्ये त्यांनी रोजच्या अर्जाच्या अटींवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

"पहिल्याच अर्जामध्ये बेमुदत आणि आमरण उपोषणाची माहिती दिली असताना रोज अर्ज देण्याची सक्ती का केली आहे? कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो? तसेच सुट्टीच्या दिवशी उपोषण करू नये असं कोणता कायदा सांगतो? असे प्रश्न जरांग यांच्याकडून करण्यात आले आहेत. 

रोजच्या परवानगीसाठी होणाऱ्या धावपळीमुळे आंदोलन कमकुवत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. तसेच पुढील आंदोलनासाठी हाच अर्ज ग्राह्य धरावा अशा मागणी जरांगे पाटील यांनी केली. 

 मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही परवानगी 

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे काल शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती. पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही परवानगी दिली. आता उद्यासाठी म्हणजेच तिसऱ्या दिवशीही मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी दिली आहे.  याबाबत आंदोलकांच्या वतीने रितसर आझाद मैदान पोलिसात अर्ज करण्यात आला होता.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत.

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षण