कुठले नगरसेवक? आता वाहनांवरील स्टिकर्सच्या क्यूआर कोडमधून समजणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:33 IST2026-04-10T13:32:29+5:302026-04-10T13:33:27+5:30
स्टिकर्सचा होतो गैरवापर; स्कॅनिंगद्वारे मिळेल माहिती

कुठले नगरसेवक? आता वाहनांवरील स्टिकर्सच्या क्यूआर कोडमधून समजणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिकेतील नगरसेवक विविध कामांनिमित्त शहरात सतत फिरत असतात. त्यांच्या वाहनांवरील स्टिकर्सवरून ती गाडी नगरसेवकांची असल्याचे ओळखता येते; मात्र संबंधित नगरसेवक कोणत्या प्रभागाचे आहेत, याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. मात्र, आता गाडीमध्ये बसलेले नगरसेवक कोणत्या प्रभागाचे आहेत, त्यांचे नाव काय? याची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी त्यांच्या वाहनांवर क्यूआर कोड असलेले स्टिकर्स लावण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्टिकर्सचा होतो गैरवापर
साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर निवडून आलेले २२७ व स्वीकृत १० असे २३७ नगरसेवक पालिकेच्या सभागृहात दाखल झाले आहेत. प्रत्येक कार्यकाळात नगरसेवकांना प्रशासनाकडून ओळखपत्रे, बिल्ले व वाहन स्टिकर्स दिले जातात. मात्र, अनेक माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांच्या वाहनांवरील ‘नगरसेवक’ स्टिकर्स कार्यकाळ संपल्यानंतरही काढले जात नाहीत. अशा स्टिकर्सचा गैरवापर होत असल्याचे आढळले आहे.
स्कॅनिंगद्वारे मिळेल माहिती
नगरसेवकांच्या वाहनावर लावण्यात आलेल्या स्टिकरवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर नगरसेवकाचे नाव, ते प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रभागाचे नाव, वाहनाचा क्रमांक दिसणार आहे. मुंबईत किंवा मुंबईबाहेर हे नगरसेवक दौऱ्यावर जात असताना, वाहने पार्क करताना व महत्त्वाच्या ठिकाणी प्रवेश मिळवताना हे स्टिकर्स त्यांच्या ओळखीचा पुरावा म्हणून उपयोगी पडतील. याच महिन्यात स्टिकर नगरसेवकांच्या वाहनांवर लावण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. १० स्वीकृत व निवडून आलेले २२७ नगरसेवक आहेत.