BMC Election 2026: मुंबईचा पुढचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? आरक्षणाच्या नव्या गणिताकडे सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:19 IST2025-12-19T12:17:56+5:302025-12-19T12:19:49+5:30
BMC Election 2026: मुंबईत १९९८ पासून महापौरपदाचे आरक्षण 'चक्राकार' पद्धतीने पडत आले आहे. मात्र, यंदा नगरसेवकांच्या प्रभागांचे आरक्षण नव्याने काढण्यात आले आहे.

BMC Election 2026: मुंबईचा पुढचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? आरक्षणाच्या नव्या गणिताकडे सर्वांचे लक्ष
मुंबई : यंदा मुंबई महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण चक्राकार (फिरते-बदलते) पद्धतीऐवजी नव्या पद्धतीने काढण्यात आले आहे. हीच पद्धत महापौर निवडताना अवलंबली जाणार की चक्राकार पद्धतीचा अवलंब होणार याविषयी आता इच्छुकांमध्ये उत्सुकता आहे.
मुंबईत १९९८ पासून महापौरपदाचे आरक्षण 'चक्राकार' पद्धतीने पडत आले आहे. मात्र, यंदा नगरसेवकांच्या प्रभागांचे आरक्षण नव्याने काढण्यात आले आहे. त्यामुळे महापौरपदाचे आरक्षणही जुन्या चक्राकार पद्धतीऐवजी नव्याने 'लॉटरी' पद्धतीने काढले जाण्याची दाट शक्यता आहे.
ही आरक्षण सोडत नव्याने झाली, तर कोणत्याही प्रवर्गाची चिठ्ठी निघू शकते, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे आणि इच्छुकांचे लक्ष लागले आहे. ७ मार्च २०२२ रोजी महापालिकेची मुदत संपल्यापासून सध्या आयुक्त प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत; परंतु आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन २० जानेवारीपर्यंत नवीन महापौरांची निवड होणार आहे.
आरक्षणाची चक्राकार पद्धत म्हणजे काय?
महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत तेच प्रभाग कायमस्वरूपी आरक्षित राहू नयेत यासाठी आरक्षण फिरत्या (चक्राकार) पद्धतीने दिले जाते. म्हणजे एकाच प्रभागावर दरवेळी त्याच समाजाचे आरक्षण राहू नये.
उद्देश काय?
कोणत्याही एका भागावर अन्याय होऊ नये, सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्वाची संधी मिळावी, स्थानिक नेत्यांना वेगवेगळ्या भागात संधी मिळावी.