कुठल्या शहरातील मतदारांनी किती दिला होता मतटक्का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 07:39 IST2026-01-11T07:39:33+5:302026-01-11T07:39:33+5:30
यंदा मतदार करणार का भरभरून मतदान? जनजागृतीकरिता पथनाट्ये, रॅली

कुठल्या शहरातील मतदारांनी किती दिला होता मतटक्का?
मुंबई / ठाणे: पालिका निवडणुकीत मुंबई महानगरांमधील मतदानाचा टक्का वाढणार की घसरणार, याची चर्चा सुरू आहे. गेल्या निवडणुकांत काही शहरांत ६० ते ६५ टक्के मतदारांनी मतदानाकडे चक्क पाठ फिरवली. निवडणुकीसाठी झालेल्या विधिनिषेधशून्य युत्या, आघाड्या, परस्परांवर शेलक्या शब्दांत केली जाणारी टीका, बिनविरोध निवडीचे फुटलेले पेव आणि मुंबई वगळता अन्यत्र मतदारांना तीन ते चार उमेदवारांना करायचे असलेले मतदान यामुळे मतदान कमी होण्याची भीती आहे.
२०१७ मध्ये मुंबईत ५५.५३ टक्के इतके मतदान झाले होते. ९१ लाख ८० हजार ६५४ पैकी ५० लाख ९७ हजार ८४० मतदारांनी मतदान केले होते. यात महिला मतदार २७ लाख ३८ हजार २९०, तर पुरुष मतदार २३ लाख ५९ हजार ४२३ व इतर १२७ मतदारांचा समावेश होता. त्यापूर्वीच्या २०१२ मधील निवडणुकीत मतदानाचे प्रमाण ४४.७५ टक्के होते.
डोंबिवलीतील मतदानाचा निरुत्साह संपणार का?
कल्याण : येथे २०१५ साली पालिका निवडणुकीत ४५.६९ टक्के मतदान झाले. तेव्हा मतदारांची संख्या १२ लाख ५० हजार ६४६ होती. त्यापैकी केवळ ५ लाख ७१ हजार ४६८ जणांनी मतदान केले. २०२६ च्या निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या १४ लाख २४ हजार ५२० आहे. २०१५ च्या तुलनेत ही संख्या एक लाख ७३ हजार ८७४ मतदारांची संख्या वाढली आहे. २००९ च्या पालिका निवडणुकीत ४६.५९ टक्के मतदान झाले होते. डोंबिवलीतील मतदानाचा टक्का राज्यात खालून दुसऱ्या क्रमांकाचा होता.
ठाण्यात मागच्या वेळची टक्केवारी तरी राखणार?
ठाणे महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत ५८.०८ टक्के मतदान झाले होते. तत्पूर्वीच्या २०१२च्या निवडणुकीत ५१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर २००७ च्या महापालिका निवडणुकीत ५६.८२ टक्के मतदारांनी मतदान केले होते. मागील वेळी मतांची टक्केवारी वाढली होती. ठाण्यात तेव्हा सत्ताधारी भाजप व शिवसेना यांच्यात संघर्ष होता. यावेळी हे दोन्ही पक्ष युती करून निवडणूक लढत आहेत.
उल्हासनगरात यंदा कोण टक्का वाढवणार?
महापालिका निवडणुकीत २०१७ मध्ये ४६.४ टक्के तर २०१२ मध्ये ४१.९६ टक्के मतदान झाले. यावेळी शिंदेसेना, ओमी कलानी व साई पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना घराघरातून बाहेर काढून मतदान करवून घेण्यात यशस्वी ठरतात का किंवा स्वबळावर लढणारा भाजप मतांचा टक्के वाढविण्यात यशस्वी होतो का, याकडे लक्ष लागले आहे.
मीरा-भाईंदर ५३ टक्के होते मतदान
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत २०१७ मध्ये एकूण मतदार पाच लाख ९३ हजार ३३६ होते. त्यापैकी दोन लाख ७९ हजार २७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतांची टक्केवारी ५३ टक्के होती. यावेळी भाजप-शिंदेसेना यांच्या लढतीमुळे मतांचे प्रमाण वाढते की घटते याकडे लक्ष आहे.
पनवेलमध्ये पहिल्याच निवडणुकीत ५९.७२ टक्के मतदान
पनवेल महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत एकूण मतदार चार लाख २५ हजार ४५३ होते. त्यापैकी दोन लाख २८ हजार ६७४ पुरुष, तर एक लाख ९६ हजार ७९० महिला मतदारांनी मतदान केले. मतदान टक्केवारी ५९.७२ टक्के होती. आताच्या निवडणुकीत एकुण मतदार पाच लाख ५४ हजार ५७८ असून त्यात पुरुष मतदार २ लाख ९४ हजार ८२१ तर महिला मतदार २ लाख ५९ हजार ६८५ आहेत.
नवी मुंबईत ४८.३५ टक्के मतदान
नवी मुंबईत मागील निवडणुकीत एकूण मतदार आठ लाख १५ हजार ०६७ इतके होते. त्यापैकी तीन लाख ९४ हजार ०६१ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ४८.३५ टक्के होती.
भिवंडीत ५१ टक्के मतदान झाले होते
भिवंडी मनपाच्या मागील २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण ५१ टक्के मतदान झाले होते. त्यापूर्वीच्या २०१२ च्या निवडणुकीत एकूण ४९.६१ टक्के मतदान झाले होते. मतदारांनी घराबाहेर पडावे याकरिता महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.