धारावीत रस्ता शोधायचा तरी कुठे?; अवैध पार्किंग, बेकायदेशीर फेरीवाल्यामुळे मार्गात अडथळ्यांची शर्यत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 05:43 IST2025-09-22T05:43:09+5:302025-09-22T05:43:42+5:30

व्यावसायिक हतबल, धारावीतील पाच हजार लघुउद्योगांच्या मालाची ने-आण करणाऱ्या हातगाड्या, मालवाहू गाड्यांच्या वाहतुकीमुळे रस्ते गजबजलेले असतात

Where to find a road in Dharavi?; Illegal parking, illegal hawkers create obstacles on the way | धारावीत रस्ता शोधायचा तरी कुठे?; अवैध पार्किंग, बेकायदेशीर फेरीवाल्यामुळे मार्गात अडथळ्यांची शर्यत

धारावीत रस्ता शोधायचा तरी कुठे?; अवैध पार्किंग, बेकायदेशीर फेरीवाल्यामुळे मार्गात अडथळ्यांची शर्यत

सचिन लुंगसे

मुंबई : सायन स्थानकाजवळील पूल नूतनीकरणासाठी बंद केल्याने संत रोहिदास मार्गावरील वाहतूक लोकमान्य टिळक रुग्णालयाजवळ असलेल्या पुलावरून वळविण्यात आली. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडली आहे. प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली.

माटुंगा लेबर कॅम्पकडे जाणारा रस्ता, धारावी पोलिस स्थानकाकडे जाणारा ९० फिट रोड आणि टी जंक्शनकडे जाणारा ६० फिट रोड यांना जोडणाऱ्या मुख्य चौकातीही हा जाच वाढला आहे. मालवाहू वाहनांची वाढलेली वर्दळ, अवैध पार्किंग, फेरीवाले, रस्त्यांची दुर्दशा,  कचराकुंड्या, पदपथाच्या अभावाने  मुख्य रस्त्यावर चालणारे पादचारी आदींमुळे धारावीमधील वाहतूककोंडीची समस्या  वाढत आहे. येथील मुख्य रस्त्यांप्रमाणेच ९० फिट रोड, धारावी मेनरोडसारख्या अंतर्गत रस्त्यांची बिकट अवस्था असल्याने धारावी कोंडीने त्रस्त आहेत. धारावीतील पाच हजार लघुउद्योगांच्या मालाची ने-आण करणाऱ्या हातगाड्या, मालवाहू गाड्यांच्या वाहतुकीमुळे रस्ते गजबजलेले असतात. मात्र येथील प्रत्येकाला कोंडीचा सामना करावा लागत आहे.

पार्किंगमध्ये हरवले रस्ते
धारावीत दुचाकी रस्त्यावरच पार्किंग कराव्या लागतात. टॅक्सी पार्किंगही रस्त्यावरच होते. निसर्ग उद्यानाला लागून असलेल्या धारावी- वांद्रे लिंक रोडवर पालिकेच्या कचरा वेचणाऱ्या गाड्या पार्क असतात. ९० फिट आणि ६० फिट रोडला त्यांच्या रुंदीमुळे ही नावे पडली. मात्र अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाल्यांसह इतर समस्यांमुळे हे रस्ते वाहतुकीसाठी २० फूट उपलब्ध आहेत. 

केवळ २० किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे
शहर विकास आराखड्यानुसार धारावीत सुमारे २० किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे आहे. येथील मुख्य रस्ता १.४७ किमी तर सायन-धारावी रस्ता २ किमीचा आहे. इतर रस्ते याहून छोटे आहेत. येथील लोकसंख्येची घनता लक्षात घेता धारावीत प्रति व्यक्ती केवळ ०.०२ मीटर रस्ता उपलब्ध आहे.

प्रस्तावित काय आहे?
धारावी पुनर्विकास प्रकल्पात रस्त्यांचा कायापालट होईल. शासनाला सादर मास्टर प्लॅनमध्ये ही बाब अधोरेखित आहे. मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणासह १२५ मीटर अंतरावर परस्परांना छेदणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचे जाळे तयार केले जाईल. सार्वजनिक वाहतुकीसह सायकलस्वार आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था प्लॅनमध्ये प्रस्तावित आहे.

Web Title: Where to find a road in Dharavi?; Illegal parking, illegal hawkers create obstacles on the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.