Join us

व्हेअर इज द पार्टी...? नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील हॉटेल्स, पब्ज, क्लब्ज सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 05:30 IST

दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदा प्रथमच लोकांना नववर्षाचे स्वागत मोकळेपणाने करता यावे, यासाठी मुंबईतील अनेक हॉटेल्स, पब्ज, क्लब्ज सज्ज झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदा प्रथमच लोकांना नववर्षाचे स्वागत मोकळेपणाने करता यावे, यासाठी मुंबईतील अनेक हॉटेल्स, पब्ज, क्लब्ज सज्ज झाले आहेत. अनेक ठिकाणी आलिशान, तारांकित पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, डीजे आणि डान्स हे दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. 

दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर क्लब आहेत. या क्लबनी आपले मेंबर आणि त्यांचे पाहुणे यांनाही यंदा पार्टीचे आमंत्रण दिले आहे. अशा ठिकाणी सदस्याकडून किमान ५०० रुपये आकारण्यात येत आहेत. तर त्यांच्यासोबत येणाऱ्या पाहुण्यांकडून १८०० ते ३ हजार रुपयांची आकारणी करण्यात येत आहे. या पैशांच्या मोबदल्यात सर्व प्रकारची खान-पान सेवा देण्यात येत आहे. तर बीकेसी, वांद्रे, जुहू आणि पूर्व उपनगरांत मोठ्या प्रमाणावर कॅफेज् व हॉटेल्समध्ये विशेष पार्ट्यांचे आयोजन केले आहे. याकरिता दोन लोकांसाठी पाच हजारांपासून ते ८ ते १० लोकांच्या ग्रुपसाठी ५० हजार रुपये आणि त्यापुढे असे पॅकेज आहेत. ३१ डिसेंबरला  मद्यालये पहाटे पाचपर्यंत तर मद्याची दुकाने रात्री १.३० पर्यंत सुरू राहणार आहेत. 

सेलिब्रिटींचे आकर्षण 

जुहू परिसरातील पंचतारांकित हॉटेलांत आयोजित पार्ट्यांचे मुख्य आकर्षण म्हणजे बॉलीवूडमधील सेलिब्रिटीज. काही सेलिब्रिटी या ठिकाणी नृत्य करणार आहेत. अशा पार्ट्यांसाठी ५० हजार रुपये किमान आकारणी केली जात आहे.

पार्टीसाठी कॅम्प...

पार्टीसाठी केवळ हॉटेल्सच नव्हेत तर, काही खाजगी कंपन्यांनी मुंबईच्या नजीक कॅम्पदेखील आयोजित केले आहेत. पॅकेजनुसार, तीन हजार ते १० हजार रुपयांचे प्रति माणशी शुल्क आकारण्यात येत आहे. अलिबाग, किहीम, रेवस, नेरळ, कर्जत, पालघर आदी पट्ट्यांत कॅम्पसाईट आयोजित करण्यात आल्या आहेत. 

डीजेंचे दर लाखांपुढे...

अनेक लोक डान्स पार्टीसाठीही उत्सुक असतात. अशा ठिकाणी डीजेंना मोठी मागणी असते. मुंबईतील अनेक लहान-मोठी हॉटेल्स, पब्ज, क्लबमध्ये लोकांना डीजेच्या धूनवर थिरकता यावे, यासाठी नामांकित डीजेंना हॉटेल्सनी बोलावले आहे. या डीजेंचे चार तासांचे दर १५ हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :नववर्षमुंबई