तुमच्या राजकारणात आमचे मुद्दे गेले कुठे...? लोकांचे 'हे' प्रश्न कसे सोडवले जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:24 IST2026-01-01T14:23:43+5:302026-01-01T14:24:13+5:30
नेत्यांच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे गेले कुठे? असा सवाल या स्तंभामधून निवडणुका होईपर्यंत विचारला जाईल.

तुमच्या राजकारणात आमचे मुद्दे गेले कुठे...? लोकांचे 'हे' प्रश्न कसे सोडवले जाणार?
महापालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, नाट्यगृह, वाचनालय, स्वच्छ चांगले फूटपाथ, चांगले उद्यान, स्थानिक पातळीवरची चांगली आरोग्य सुविधा या विषयांची चर्चा व्हावी असे नागरिकांना वाटते. लोकांचे हे प्रश्न कसे सोडवले जाणार? याची उत्तरे नागरिकांना हवी असतात. मात्र, धर्म, भाषा, जात या पलीकडे निवडणुका जायला तयार नाही. आरे ला कारे म्हणणे, ठोकाठोकीची भाषा करणे, अत्यंत टोकाला जाऊन राजकारण करणे याच गोष्टी निवडणुकीत जाणीवपूर्वक आणल्या जातात. कारण सामान्य जनतेच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर उमेदवारांना आणि पक्षांना बोलायचेच नसते, असा समज दृढ होत चालला आहे. म्हणूनच हा स्तंभ तुमच्यासाठी. नेत्यांच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे गेले कुठे? असा सवाल या स्तंभामधून निवडणुका होईपर्यंत विचारला जाईल.
बस्तान : गोरेगाव रेल्वे स्टेशनबाहेर चालणे अवघड
गो रेगाव ‘पी’ दक्षिण विभागात फेरीवाल्यांचा सुळसुळाट आहे. सकाळी आणि सायंकाळी रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात चालायचे कसे, असा प्रश्न पडतो. बेस्ट स्थानकातून बस बाहेर जाताना आणि येताना चालकांचीही कसरत होते. पूर्वेला डी. पी. रोडवर बँकेबाहेर अनेक फेरीवाले ठाण मांडून बसतात. विक्रेते कोणालाही दाद देत नाहीत. फेरीवाले फूटपाथवर आणि चालणारे रस्त्यावर त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही तर नवल. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना होतो. मात्र, लोकप्रतिनिधींना इकडे पाहायला वेळ नाही. आता या परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून येण्याची इच्छा असलेल्यांनी तरी महापालिकेकडे दाद मागायला हवी. उच्च न्यायालयाने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिकेची कानउघाडणी केल्यावर आता ‘पी’ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त कारवाईचा बडगा उगारतील का? असा प्रश्न पडणे साहजिक आहे.
कोंडी : विद्याविहार पुलाचे
काम पूर्ण होणार कधी?
वि द्याविहार पूर्व व पश्चिमेला जोडणारा पूल वाहतुकीस कधी खुला होणार? हे एक कोडेच आहे. या पुलाचे काम लवकर झाले तर घाटकोपर, चेंबूर आणि कुर्ला परिसरामधील कोंडी दूर होईल. आता कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर परिसरातील नागरिकांना पूर्व-पश्चिमेला जाण्यासाठी कुर्ला, घाटकोपरला वळसा घालावा लागतो. मात्र, त्याचे कोणाला सोयरसुतक नाही. निवडणूक लढवायची आणि निवडून यायचे, एवढेच नगरसेवकाचे काम आहे का? येथून निवडणूक लढविणाऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला नको का? पूल झाला तर मुंबईकरांचे ३० ते ३५ मिनिटे वाचतील. मात्र, वाहतूक कोंडीत मुंबईकर अडकून पडला पाहिजे, असेच जणू नियोजन दिसत आहे. सौमय्या विद्यापीठ, राजावाडी रुग्णालय, कॉर्पोरेट पार्क येथे कामानिमित्त रोज हजारो लोक येतात. २०२३ पर्यंत काम पूर्ण होणार होते. आता २०२६ सुरू झाले आहे.
धक्के : परळ स्टेशनबाहेर फेरीवाल्यांची पथारी
प्र भादेवी पूल पाडल्यानंतर प्रवाशांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परळ स्टेशनबाहेरील परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकला आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना अक्षरश: धक्के खात स्टेशन गाठावे लागते. फूटपाथवरील अतिक्रमणांमुळे चालण्यासाठी जागाच नाही. फेरीवाल्यांच्या अरेरावीमुळे अनेकदा प्रवासी आणि विक्रेत्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. मात्र त्याकडे पाहण्यास आणि त्याचा पाठपुरावा करण्यास येथील पक्ष कार्यकर्त्यांना वेळ नाही. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकलमध्ये धक्काबुक्कीचा सामना करणाऱ्या प्रवाशांना आता स्टेशनवर पोहोचतानाही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
दुर्गंधी : या चौकातून नाकावर रुमाल न धरता चालून दाखवा!
दा दर पश्चिमेकडील बाल गोविंददास रोड आणि जे. के. सावंत या रस्त्याच्या कोपऱ्यावरील चौक कचऱ्याने व्यापला आहे. साहजिकच येथून जाताना दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावावा लागतो. रस्त्याच्या एका बाजूला दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, यशवंत नाट्यगृह ही सांस्कृतिक केंद्रे तर दुसऱ्या बाजूला रुपारेल कॉलेज, तिसरा जोडरस्ता सरळ प्लाझा थिएटर आणि शिवाजी मंदिर नाट्यगृहाकडे जातो. जवळच मनसेचे मुख्यालय ‘राजगड’ आहे. १०० पावलांवर शिवसेना भवन आहे. इथूनच हाकेच्या अंतरावर पालिकेचे जी-उत्तर यानगृह आहे. मुंबईचे वैभव असलेल्या वास्तूंच्या या परिसरातील चौकात मात्र कचऱ्याची दुर्गंधी आहे. मराठी माणूस हे कसे सहन करतोय, देव जाणे.