तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे? ...मात्र धर्म, भाषा, जात या पलीकडे निवडणुका जायला तयार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:50 IST2026-01-03T14:50:06+5:302026-01-03T14:50:22+5:30
महापालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, नाट्यगृह, वाचनालय, स्वच्छ चांगले फुटपाथ, चांगले उद्यान, स्थानिक पातळीवरची चांगली आरोग्य सुविधा या विषयांची चर्चा व्हावी असे नागरिकांना वाटते. लोकांचे हे प्रश्न कसे सोडवले जाणार? याची उत्तरे नागरिकांना हवी असतात. मात्र धर्म, भाषा, जात या पलीकडे निवडणुका जायला तयार नाही.

तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे? ...मात्र धर्म, भाषा, जात या पलीकडे निवडणुका जायला तयार नाही
महापालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, नाट्यगृह, वाचनालय, स्वच्छ चांगले फुटपाथ, चांगले उद्यान, स्थानिक पातळीवरची चांगली आरोग्य सुविधा या विषयांची चर्चा व्हावी असे नागरिकांना वाटते. लोकांचे हे प्रश्न कसे सोडवले जाणार? याची उत्तरे नागरिकांना हवी असतात. मात्र धर्म, भाषा, जात या पलीकडे निवडणुका जायला तयार नाही. आरे ला कारे म्हणणे, ठोकाठोकीची भाषा करणे, अत्यंत टोकाला जाऊन राजकारण करणे याच गोष्टी निवडणुकीत जाणीवपूर्वक आणल्या जातात. कारण सामान्य जनतेच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर उमेदवारांना आणि पक्षांना बोलायचेच नसते, असा समज दृढ होत चालला आहे. म्हणूनच हा स्तंभ तुमच्यासाठी. नेत्यांच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे गेले कुठे? असा सवाल या स्तंभामधून निवडणुका होईपर्यंत विचारला जाईल.
खोदकाम : धूळ रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणार का?
म हानगरातील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेच्या रखांगी चौकात असलेल्या सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाच्या बाहेरील भाग पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. मुंबईत वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राडारोडा, डेब्रिज, मातीचे ढीग बॅरिकेडिंग करून ठेवण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. तसेच यातून धूळ उडून प्रदूषण होऊ नये, याची खबरदारी घेण्यास यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र रखांगी चौकात सुरू असलेल्या कामात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) कंत्राटदाराकडून या नियमांना तिलांजली देत मातीचे ढीग तसेच ठेवल्याचे दिसत आहे. त्यातून वाऱ्याने माती उडून प्रदूषणात भर पडत आहे. यावर पालिका कधी कारवाई करणार? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. तसेच प्रदूषण रोखणाऱ्या नियमांना सरकारी यंत्रणांच्या प्रकल्पातच हरताळ फासणे कधी बंद होणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
उद्ध्वस्त : पुनर्विकासाच्या नावाखाली मंडया संकटात
ए काच छताखाली अनेक दुकाने सामाविणाऱ्या मंडया या मुंबईतील व्यापाराच्या हक्काच्या जागा. मात्र, पुनर्विकासाच्या नावाखाली याच मंडईंचे अस्तित्व संकटात आहे. परळची ऐतिहासिक शिरोडकर मंडई ७ मे २०१५ रोजी पाडली गेली, पण दिलेली आश्वासने कागदावरच राहिली. ११ वर्षे उलटूनही ४० टक्केही काम पूर्ण नाही. १४३ दुकानदार व रहिवाशांना हक्काची जागा मिळालेली नाही. ५० हून अधिक दुकानदारांचे संसार उद्ध्वस्त झाले. फाइल इकडे-तिकडे फिरतेय, अशी कारणे देत पालिका बोळवण करत आहे. जागा न देता उलट गेली आठ वर्षे भाडे वसूल केले जात असून लायसन्स रद्द करण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. हा प्रश्न एका मंडईपुरता नाही. मुंबईत तब्बल ९२ मंडईंचा पुनर्विकास रखडलेला आहे. पालिकेचे हे असेच हळुवार धोरण असेल तर त्यांचा पुनर्विकास होणार तरी कधी? हा प्रश्न प्रचारात कुणी घेणार का? हा सवाल आहे.
प्रदूषण : श्वासात धूळ घेऊन त्यातून ‘ऑक्सिजन’ मिळवितो
वि क्रोळीतील कन्नमवार नगर आणि टागोर नगर या मोठ्या वसाहतीत गेल्या काही वर्षांपासून पुनर्विकासाची कामे जोरात सुरू आहेत. एका बाजूला डम्पिंग ग्राउंडची दुर्गंधी, तर दुसऱ्या बाजूला बांधकामाची धूळ. यामुळे ‘आम्ही श्वास घेताना शरीरात प्रदूषणही शोषून घ्यायचे का ?, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. बांधकामाचे डेब्रिज वेळच्या वेळी उचला, धुळीचा बंदोबस्त करा, असे पालिका सांगत असताना प्रकल्पस्थळी मात्र विकासक त्यास जुमानत नसल्याचे दिसते. बांधकामाचे डेब्रिज फूटपाथच्या बाजूला बिनदिक्कतपणे टाकून दिलेले आहे. रस्ता स्वच्छ करताना कचऱ्याचे ढिगारेही तसेच पडलेले असतात. वाऱ्यासोबत धूळ नाकातोंडात जाते. ज्येष्ठांना त्याचा सर्वाधिक त्रास होतो. मात्र, बांधकामामुळे होणाऱ्या या प्रदूषणाकडे वेळ देण्यास राजकीय पक्षांना वेळ नाही. निवडणुकीच्या धबडग्यात असल्या ‘क्षुल्लक’ मुद्द्यांकडे लक्ष द्यायला कुणाकडे वेळ
आहे ?, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
अवकळा : कुर्ला पश्चिमेत सौंदर्यीकरणाचे तीनतेरा
रे ल्वे स्थानकाच्या पश्चिमेला कुर्ला येथे गणपती मंदिराशेजारी मोठा गाजावाजा करत भुयारी मार्ग विलंबाने का होईना, बांधण्यात आला. भुयारी मार्गाला पूर्व-पश्चिम अशी दोन्ही बाजूला प्रवेशद्वारे बांधण्यात आली. पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर रंगरंगोटी करत सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र आता या सौंदर्यीकरणाला अवकळा आली आहे. प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या अश्वाच्या प्रतिकृतीची दुरवस्था झाली आहे. प्रतिकृतीवर जाहिराती चिटकविण्यात आल्या आहेत. पावसाच्या पाण्याने प्रतिकृती फुगली आहे. अश्वाचा भाग एकीकडे आणि प्रतिकृतीची संरचना दुसरीकडे अशी अवस्था झाली आहे. मात्र ना पालिकेला याचे काही पडले आहे, ना लोकप्रतिनिधींना.