Join us

गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:54 IST

गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घातली. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवल्याने पक्षी मित्रसंस्थांना माघार घ्यावी लागली.

मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने कारवाई केल्यामुळे दादरचा वादग्रस्त कबुतरखाना पूर्णपणे बंद झाला आहे. या परिसरातील कबुतरांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घातली. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवल्याने पक्षी मित्रसंस्थांना माघार घ्यावी लागली. कबुतरखान्यांमुळे शहरातील पर्यावरण आणि मानवी आरोग्याशी निगडित समस्या, आजार उद्भवत असल्याने न्यायालयाने बंदीचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकाप्रशासनाने बंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे. कबुतरखाना परिसरात पोलिस, पालिका अधिकारी तैनात असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दादर कबुतरखान्याजवळ दोन-तीन दाणेविक्रेते होते. आता तेही निघून गेल्याचे एका दुकानदाराने सांगितले. जैन समाजाने आंदोलन कबुतरखान्याचे आच्छादन जबरदस्तीने काढल्यानंतर तेथे एक पोलिस व्हॅन कायमस्वरूपी उभी करण्यात आली आहे.

अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्यावतीने एक अभ्यास समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती वैद्यकीय आणि कायदेशीर बाबींवर अभ्यास करून आपला सर्वकष अहवाल सादर करेल. त्यानंतर समाज सर्व कायदेशीर पर्यायांचा अभ्यास करून आपली भूमिका न्यायालयाच्या समितीपुढे स्पष्ट करेल, असे जैन समाजातर्फे सांगण्यात आले.

दाणे टाकण्यावर बंदी घालणे अयोग्य

जैन समाजाचे सदस्य अशोक चांदमल यांनी सांगितले की, कबुतरांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. कारण, दादरमध्ये दाणे मिळत नसल्याने काही कबुतरे इतरत्र गेली असण्याची शक्यता आहे. कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घालणे योग्य नाही. कबुतरांची काळजी घेण्याचे पर्यायही पाहिले जावेत. कबुतरांना काही प्रमाणात दाणे टाकण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

आरोग्यास धोका...

कबुतरांमुळे मानवी आरोग्यास धोका असल्याचे उच्च न्यायालयाच्या सप्रमाण निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने कबुतरांना दाणे टाकण्यास मनाई केली. कबुतरांची विष्ठा घातक रोगांना कारणीभूत ठरते. त्यातून श्वसनविकार जडतात, फुप्फुसांना संसर्ग होतो. अस्थमा, दम्याच्या रुग्णांच्या जीवावरही बेतू शकते. हे सर्व थोके उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यात आले होते.

टॅग्स :मुंबईकबुतरमुंबई हायकोर्टमुंबई महानगरपालिका