हजारो शाळा ‘हरित’ होणार कधी? वेळेअभावी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पंधरवडा जाहीर करण्याची शिक्षकांवर आली वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2025 08:57 IST2025-10-05T08:56:32+5:302025-10-05T08:57:04+5:30
- घन:श्याम सोनार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग योजनेअंतर्गत महानगरात ...

हजारो शाळा ‘हरित’ होणार कधी? वेळेअभावी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पंधरवडा जाहीर करण्याची शिक्षकांवर आली वेळ
- घन:श्याम सोनार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग योजनेअंतर्गत महानगरात महापालिकेच्या आणि उपसंचालक अंतर्गत १ हजार ४० शाळांनी १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण केलेले नाही. याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाने नुकताच जाहीर केला आहे. दुसरीकडे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ हवा. त्यासाठी ‘पंधरवडा’ जाहीर करण्याची वेळ आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने स्वच्छ व हरित शाळा ही योजना पाणी, स्वच्छता व ‘मिशन लाईफ’ उपक्रमाशी जोडलेली आहे. या योजनेंतर्गत स्वच्छता आणि पर्यावरणबाबत सर्वेक्षणासाठी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत दिली होती. आताही शाळांना १५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
४ ऑक्टोबरपर्यंत २,१०६ शाळांपैकी फक्त १,६४८ शाळांनी सर्वेक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण उपसंचालक अंतर्गत सहभागी १,४०५ पैकी ८८३ शाळांनी सर्वेक्षण पूर्ण केले. पालिकेच्या ४५८ तर शिक्षण विभागाच्या ५८२ मिळून १,०४० शाळांचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही.
अनेक ठिकाणी मैदाने नसल्याने हिरमोड
अनेक शाळांना मैदाने नाहीत. शिक्षकांची कमतरता व विविध ऑनलाइन माहिती भरण्याच्या जबाबदाऱ्यांमुळे शाळांवर ताण वाढला आहे. स्वच्छ व हरित शाळा उपक्रमासाठी आधी शासनाने निधी द्यावा, अन्यथा या उपक्रमांचा फायदा होणार नाही. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा ,असे बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटना प्रवक्ते सचिन गवळी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर लक्ष देता यावे, यासाठी प्रशासनाने अध्यापन स्वातंत्र्य द्यावे. शाळेत शिकवण्याकरिता शिक्षकांना पंधरवडा मोहीम सरकारने जाहीर करण्याची वेळ आली आहे.
- शैलेंद्र वाघ, अतिरिक्त शिक्षक प्रतिनिधी