एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल कधी लागणार? स्थापत्य सेवेचा निकाल रखडल्याने असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:23 IST2024-12-14T08:23:42+5:302024-12-14T08:23:56+5:30

सुमारे ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. याचा निकाल कधी लागणार याबाबत कोणती ठोस माहिती एमपीएससीकडून दिली जात नाही.

When will the MPSC main exam result be out? Dissatisfaction over delay in Civil Services results | एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल कधी लागणार? स्थापत्य सेवेचा निकाल रखडल्याने असंतोष

एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल कधी लागणार? स्थापत्य सेवेचा निकाल रखडल्याने असंतोष

- दीपक भातुसे
लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल एक वर्षापासून रखडला असून, विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवेच्या ४९५ पदांसाठी ४ जून २०२३ रोजी पूर्व परीक्षा पार पडली, तर २८ जानेवारी २०२४ रोजी मुख्य परीक्षा पार पडली. परीक्षा होऊन वर्ष संपत आले तरी मुख्य परीक्षेचा निकाल रखडला आहे. 

सुमारे ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. याचा निकाल कधी लागणार याबाबत कोणती ठोस माहिती एमपीएससीकडून दिली जात नाही. आम्ही अनेकवेळा एमपीएससीच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली असता, १५ दिवसांत निकाल जाहीर होईल, तर कधी पुढच्या महिन्यात निकाल जाहीर होईल असे उत्तर मिळत आहे, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. 

आणखी किती वेळ?
एमपीएससी राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक स्वरूपात घेण्याचे नियोजन करत आहे. मात्र, स्थापत्य अधिकारी सेवेची मुख्य परीक्षा केवळ २ वर्णनात्मक पेपरची असूनही तिचा निकाल एक वर्ष होत आले तरी जाहीर केलेला नाही. मग राज्यसेवा परीक्षेसाठी असलेल्या ९ वर्णनात्मक पेपरच्या मूल्यांकनासाठी एसपीएससी किती काळ लावणार? त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे संसाधन व पायाभूत सुविधा आहेत का? असे सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहेत.

Web Title: When will the MPSC main exam result be out? Dissatisfaction over delay in Civil Services results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.