केबल स्टेड पुलाचे उद्घाटन कधी? पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विद्यापीठ चौकात कोंडीचा प्रश्न गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:36 IST2025-07-25T13:35:03+5:302025-07-25T13:36:04+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘एससीएलआर’ रस्त्याचे सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केला आहे.

केबल स्टेड पुलाचे उद्घाटन कधी? पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विद्यापीठ चौकात कोंडीचा प्रश्न गंभीर
मुंबई : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडच्या (एससीएलआर) शेवटच्या टप्प्यातील केबल स्टेड पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने या पुलाचे लोकार्पण रखडले आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला न झाल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबई विद्यापीठ चौकात वाहतूक कोंडी होत असून, त्याचा फटका वाहनचालक व प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा पूल वाहतुकीस खुला करून दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘एससीएलआर’ रस्त्याचे सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केला आहे. अंतिम टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाला दहिसर दिशेला जोडण्यासाठी विद्यापीठ चौकात केबल स्टेड पूल उभारला आहे. तो ऑर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील असून, २१५ मीटर लांबीचा आहे. हा पूल जमिनीपासून २५ मीटर उंचीवर असून, देशातील सर्वाधिक तीव्र वळण असलेला पूल ठरणार आहे.
अंतिम टप्प्यातील कामे सुरू
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील केबल स्टेड पुलाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या पुलाच्या १०० मीटर लांबीच्या वक्राकार भागाखालील तात्पुरती आधाररचना हटवण्याचे तसेच पुलाच्या खांबाचे रंगकाम आणि अंतिम टप्प्यातील सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत.
या अंतिम प्रक्रिया पुलाच्या दीर्घकालीन सुरक्षितता, टिकाऊपणा आणि सौंदर्यात्मक गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे एमएमआरडीएने जाहीर केले.
कलानगर जंक्शन पुलाचे लोकार्पणही लांबणीवर
कलानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उभारलेल्या ३१० मीटर लांबीच्या तिसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण होऊनही लोकार्पणाचा मुहूर्त एमएमआरडीएला मिळाला नाही.
उद्धवसेनेचे नेते व आमदार वरुण सरदेसाई यांनी बॅरिकेड हटवून पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. मात्र एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा बॅरिकेड लावून मार्गिका वाहतुकीसाठी बंद केली होती.
त्यावेळी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता चार ते पाच दिवसांत इलेक्ट्रिकची कामे पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तेव्हापासून हा पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.