राजकीय पक्ष तृतीयपंथींना उमेदवारी कधी देणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:02 IST2025-05-22T14:02:08+5:302025-05-22T14:02:33+5:30
२०१७ मध्ये तृतीयपंथी उमेदवार प्रिया पाटील यांनी कुर्ला येथील वॉर्ड १६६ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर भाजप, शिवसेना, कॉँग्रेस आणि मनसेचे प्रमुख दावेदार होते. या निवडणुकीत प्रिया पाटील यांना २७ मते मिळून त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.

राजकीय पक्ष तृतीयपंथींना उमेदवारी कधी देणार?
मुंबई : गेल्या विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत झालेला पराभव तृतीयपंथी समाजाच्या जिव्हारी लागला असून येत्या महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून नाही, तर मुख्य प्रवाहातील प्रमुख पक्षांनी तिकीट द्यावे, अशी अपेक्षा या समाजाने व्यक्त केली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी तृतीयपंथींसाठी कक्ष स्थापन केला, पुढे काय? असा सवालही आता त्यांच्याकडून विचारला जात आहे.
२०१७ मध्ये तृतीयपंथी उमेदवार प्रिया पाटील यांनी कुर्ला येथील वॉर्ड १६६ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर भाजप, शिवसेना, कॉँग्रेस आणि मनसेचे प्रमुख दावेदार होते. या निवडणुकीत प्रिया पाटील यांना २७ मते मिळून त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.
मागील विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदार संघातून शमीभा पाटील या तृतीयपंथी उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवले. एमए शिक्षण पूर्ण केलेल्या पाटील यांना ८,४५३ मते मिळाली.निवडणुकीतील अशा अनुभवामुळे निवडणुकीबाबत तृतीयपंथी समाजात नैराश्याचे वातावरण आहे.
भाजप, राष्ट्रवादीचा
असाही पुढाकार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन महिन्यांपूर्वी तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पक्षाची ‘तृतीयपंथी आघाडी’ स्थापन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही २०१९ मध्ये पुण्याला चांदणी गोरे या तृतीयपंथी व्यक्तीची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
सेल स्थापन केला, पण...
तृतीयपंथी समाजातील ज्येष्ठ समाजसेविका गौरी सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘ भाजप किंवा राष्ट्रवादी कॉँग्रेसने केवळ तृतीयपंथी सेल स्थापन केला, पण पुढे काय? हे प्रमुख पक्ष तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी देतील का?’ असा सवाल त्यांनी विचारला.