बेस्टची शेवटची बस लवकर सुटते तेव्हा; मार्ग क्रमांक १७२ बद्दल प्रवाशांच्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 10:38 IST2025-04-30T10:37:01+5:302025-04-30T10:38:40+5:30
वडाळा, ॲन्टॉप हिल, सीजीएस, प्रतीक्षा नगरमधील अनेकजण या बसचे नियमित प्रवासी आहेत. सोमवारी रात्रीही १७२ ही शेवटची बस अनेक प्रवाशांना चकवा देऊन निर्धारित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे लवकर सोडण्यात आली.

बेस्टची शेवटची बस लवकर सुटते तेव्हा; मार्ग क्रमांक १७२ बद्दल प्रवाशांच्या तक्रारी
मुंबई : शेवटची बस असो की लास्ट लोकल ती पकडून घर गाठण्यासाठी रात्री उशिरा कामावरून सुटणारे अनेक मुंबईकर आटापिटा करतात. पण या शेवटच्या बसने किंवा लास्ट लोकलनेच दगा दिला तर?, म्हणजे ती लवकर सुटली तर?, अनेकदा असे घडते. कॉ. प्र. के. कुरणे चौकातून रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी सुटणाऱ्या १७२ या शेवटच्या बसच्या बाबतीत हा प्रकार वारंवार घडतो, अशी नियमित प्रवाशांची तक्रार आहे.
वडाळा, ॲन्टॉप हिल, सीजीएस, प्रतीक्षा नगरमधील अनेकजण या बसचे नियमित प्रवासी आहेत. सोमवारी रात्रीही १७२ ही शेवटची बस अनेक प्रवाशांना चकवा देऊन निर्धारित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे लवकर सोडण्यात आली. त्याचा नियमित प्रवाशांना फटका बसला. ही बस कॉ. कुरणे चौकातून रात्री १२:३५ वाजता सुटल्यानंतर दादर येथील वीर कोतवाल उद्यानाच्या स्टॉपवर १२:४५ वाजता पोहोचते.
प्रवाशांचे बसशी भावनिक नाते...
शेवटची बस किंवा लोकल कधीही रद्द केली जात नाही, असे म्हटले जाते. कारण अनेकांचे या बस किंवा लोकलशी भावनिक नाते असते.
शेवटची बस एकवेळ उशिरा सोडली तरी चालेल पण निर्धारित वेळेआधी मात्र ती सोडू नये, असे बेस्ट प्रशासनाचे संकेत आहेत.
कारण रात्री उशिरा कामावरून सुटणाऱ्यांना घरी पोहोचवणारे एकमेव विश्वासार्ह सरकारी वाहन असते.