जेव्हा चित्रं सांगतात रुग्णांच्या वेदनेची गोष्ट.. ‘आर्ट फॉर हेल्थ’ चित्रप्रदर्शनाने हेलावले कलारसिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 08:37 IST2025-01-09T08:36:23+5:302025-01-09T08:37:20+5:30
१३ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य खुले राहणार आहे.

जेव्हा चित्रं सांगतात रुग्णांच्या वेदनेची गोष्ट.. ‘आर्ट फॉर हेल्थ’ चित्रप्रदर्शनाने हेलावले कलारसिक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जीवघेणा आजार, त्यामुळे प्रियजनांची होणारी फरपट, योग्य औषधोपचार, डॉक्टरांची मेहनत आणि जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या सर्वांच्या बळावर अनेक रुग्ण दुर्धर आजारातून खडखडीत बरे होतात आणि पुन्हा आपले आयुष्य नव्याने जगू लागतात. अशाच काही रुग्णांच्या, डॉक्टरी उपचारांच्या कथा चित्ररुपातून समोर आल्या आहेत. जहांगीर आर्ट गॅलरीत सध्या सुरू असलेले ‘आर्ट फॉर हेल्थ’ हे चित्र प्रदर्शन चर्चेचा विषय ठरले आहे. यातील प्रत्येक चित्रासोबतच्या स्टोरी वाचल्यावर प्रदर्शन पाहायला येणाऱ्या कलाप्रेमींचे डोळे पाणावत आहेत. कारण या गोष्टी आहेत ४७ रुग्णांच्या वेदनादायी वास्तव सांगणाऱ्या.
संशोधन व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अमी शाह आणि मधुमेहतज्ज्ञ डॉ. राजीव कोवील यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन आकाराला आले आहे. दोघेही मागील तीन वर्षांपासून कला आणि आरोग्यावर काम करत असून त्यांचे हे पहिलेच चित्र प्रदर्शन आहे. यासाठी ४७ वेगवेगळ्या डॉक्टर्सशी संपर्क साधून, ४७ वेगवेगळ्या रुग्णांच्या स्टोरीज तयार केल्या आणि त्यावर ४० चित्रकारांकडून ४७ चित्रे काढून घेतली. प्रत्येक चित्राच्या निर्मितीमध्ये डॉक्टर, रुग्ण, त्यांची काळजी घेणारे आणि चित्रकार अशा चार जणांचा सहभाग आहे. यातील एका चित्रावर काम करण्यासाठी तीन ते पाच महिन्यांचा कालावधी लागला आहे. सकारात्मकता निर्माण करणे, केअर गिव्हरच्या भूमिकेला अधोरेखित करणे आणि लोकांमध्ये वैद्यकीय साक्षरता निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे. १३ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य खुले राहणार आहे.
आशेचा नवा किरण...
‘लोकमत’शी बोलताना डॉ. अमी शाह म्हणाल्या की, प्रदर्शनाद्वारे कर्करोगग्रस्त, अवयव प्रत्यारोपण केलेले रुग्ण, महिलांचे आजार, मुलांचे आजार, मानसिक आरोग्याशी झगडणारे अशा विविध रुग्णांच्या कथा समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही चित्रे पाहिल्यावर लोकांना आशेचा एक नवीन किरण दिसेल.
गोष्ट श्रेयस तळपदेची
- डिसेंबर २०२३ मध्ये अभिनेता श्रेयस तळपदेला चित्रपटाच्या सेटवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्याला रुग्णालयात नेले आले, तेव्हा त्याची हार्टबीट लाईन सरळ होती.
- वैद्यकीय भाषेत तो मृत होता; पण डॉक्टरांनी त्याला रिवाईस केले. त्यातून तो कसा बाहेर आला, त्याची गोष्टही एका चित्राद्वारे सांगण्यात आली आहे. श्रेयसपेक्षा खूप मोठा धक्का त्याची पत्नी दीप्तीला बसला होता. त्यामुळे त्या चित्रात दीप्तीची मन:स्थितीही रेखाटली आहे.