Join us

त्यात काय मोठेसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:58 IST

हवामान बदलाला कोणत्या वनस्पती कसा प्रतिसाद देतील, त्यातून पिकांवर तसेच एकूणच जैवविविधतेवर काय परिणाम होतील याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने संशोधन जगभरात सुरू आहे.

- रेश्मा जठार(पर्यावरण संशोधक) जानेवारीच्या सुरुवातीलाच महामुंबईच्या परिसरात ठिकठिकाणी पळस फुललेला पाहिला तेव्हा वाटले, अलीकडे पळस फारच लवकर फुलू लागला आहे की काय? फार नाही, तरी दहा-बारा वर्षांपूर्वीपर्यंतची माझी आठवण आहे; या परिसरात फेब्रुवारीमध्ये पळस फुललेला दिसू लागत असे. हे माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित निरीक्षण आहे, याला वैज्ञानिक पुरावा माझ्याकडे नाही.

पालवी फुटणे, कळ्या येणे, फुलणे, फळ धरणे आणि पानगळ या वनस्पतींच्या जीवनच्रकातील प्रत्येक टप्प्याला ‘फिनॉफेज’ असे म्हणतात आणि त्याच्या अभ्यासाला ‘फिनॉलॉजी’. अत्यंत गजबजलेल्या शहरात, दाटीवाटीच्या लोकवस्तीत राहत असलेल्यांनासुद्धा (आजूबाजूला जाणीवपूर्वक लक्ष ठेवले तर) बदलत्या ऋतूंबरोबर झाडांची बदलणारी रूपे सहज दिसतात. सालाबादप्रमाणे पालवी फुटते, झाड फुलते, फळते आणि मग पानगळही होते.

या बदलांविषयी मला कायम नवलाई वाटत आली आहे. या नैसर्गिक क्रिया नेमाने सुरळीत चालण्यामागे नानाविध जैविक आणि अजैविक घटक आपापली भूमिका चोख बजावीत असतात. नियमितता इतकी की माणसाच्या पिढ्यान्-पिढ्यांनी त्या गृहीत धरून आपल्या पारंपरिक ज्ञानात भर घातली आहे. कवी, साहित्यकारांनी कलाकृतीत त्यांचे उल्लेख केले आहेत. त्या कलाकृतींच्या निर्मितीनंतर शतके उलटून गेली आहेत, तरीसुद्धा ही निरीक्षणे अचूक लागू होताना दिसतात. तसेच, वेगवेगळ्या वनस्पतींवर अवलंबून लहानमोठ्या प्राण्यांनी जसे की परागीवहन करणारे कीटक, पक्षी आदींनी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत त्या त्या वनस्पतीच्या फिनॉफेजनुसार आपापली जीवनचक्रे जुळवून घेतली आहेत. 

‘फिनॉलॉजी’चा आपल्या दैनंदिन आहाराशी थेट संबंध आहे. आपल्या आहारात वनस्पतींच्या बिया, पाने, फुले, फळे, खोड, मुळे इ. जवळपास सर्वच भाग असतात. जिरे हे फळ आहे; तर केशर हे फुलातील स्त्रीकेसर! 

शेती, अन्नप्रक्रिया, साठवणीच्या आधुनिक पद्धतींमुळे बरेच वनस्पतीजन्य खाद्यपदार्थ सर्वत्र, सर्वकाळ मिळू लागले आहेत. तरी सर्व निसर्ग क्रियांवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे माणसाला शक्य झालेले नाही म्हणून बरे; नाही तर ठराविक ऋतूंची ठराविक खाद्यपदार्थांसाठी आवर्जून वाट पाहण्याच्या, ऋतूच्या आगमनाबरोबर रुचीपालट अनुभवता आला म्हणून होणाऱ्या लहानशा, विनासायास मिळणाऱ्या आनंदाला आपण पूर्णपणे मुकलो असतो.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर, या निसर्ग क्रियांच्या अभ्यासाला विशेष महत्त्व आले आहे. हवामान बदलाला कोणत्या वनस्पती कसा प्रतिसाद देतील, त्यातून पिकांवर आणि पर्यायाने कृषी उत्पादनावर, तसेच एकूणच जैवविविधतेवर काय परिणाम होतील याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू आहे.

येता-जाता सहज नजरेस पडणारी आणि नित्यनेमाची म्हणून गृहीत धरलेली ऋतुबदलाची चिन्हे ही माणसाला पूर्णपणे आकलन न झालेल्या सोपानी क्रमाचा भाग आहेत, त्यावर सारी सृष्टिव्यवस्था (आपले रोजचे जेवणसुद्धा) अवलंबून आहे, हे एकदा लक्षात घेतले की त्यात काय मोठेसे आहे, याचा किमान अंदाज तरी सुज्ञ वाचकांना निश्चित येईल! 

टॅग्स :पर्यावरणमुंबई