Join us  

"पक्ष कोणाताही असू द्या, आपण आपली माणसं सांभाळायची"; इंदुरीकरांचा किर्तनातून सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 6:57 PM

आपल्या हटके किर्तनशैलीमुळे प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेले निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या किर्तनातून प्रबोधन करतात.

मुंबई/जळगाव - राज्यातील राजकारण गेल्या ४ ते ५ वर्षात एवढं बदललंय की अक्षरश: सर्वसामान्य माणसानेही तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. कोणता पक्ष कधी कोणासोबत युती करेल आणि कोणता नेता कधी कोणत्या पक्षात प्रवेश करेल हे सांगता येणार नाही. राजकारण हे अनिश्चिततेचा खेळ बनलंय. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बनलं. त्यानंतर, शिवसेनेत फूट पडली अन् महायुती सरकार बनलं. आता, राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार गट महायुतीत सामिल झाला आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांच्या भूमिकांचा कोणालाच मेळ लागत नाहीय. 

आपल्या हटके किर्तनशैलीमुळे प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेले निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या किर्तनातून प्रबोधन करतात. यावेळी, ते वस्तुस्थिती आणि सद्यस्थितीचे दाखलेही देताना दिसून येतात. राजकीय घडामोडींवर बोलण्याचं शक्यतो ते टाळत आहेत. मात्र, नुकतेच त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. यावेळी, भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांचं कौतुक करताना सध्या पक्षाचं काहीच राहिलं नाही. कोण कोणत्या पक्षात हे कळायला मार्ग नाही, असे म्हणत इंदुरीकरांनी पक्षापेक्षा व्यक्तीला महत्त्व असल्याचं म्हटलं. तसेच, आमदार होणं साधी गोष्ट नाही, त्यासाठी गडगंज संपत्तीचा धनी असायला हवं, असा सूर इंदुरीकर महाराजांच्या भाषणातून दिसून आला.  

आमदार होण्यासाठी एक-दोन कारखाने, पाच-सहा कॉलेज लागतात, १०० एक पतसंस्था आणि हजारभर कर्मचारी असायला पाहिजेत, असे   इंदुरीकर महाराज यांनी म्हटले. जळगावातील चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात बोलत होते. यावेळी, आमदार चव्हाण यांच्या कार्याचं कौतुकही केलं. 

''आमदार होण्यासाठी एक-दोन कारखाने, पाच-सहा कॉलेज, १००-२०० पतसंस्था, १००-१५० बचत गट आणि एक हजार कर्मचारी हाताखाली लागतात. तेव्हा आमदार होता येतं. पण, मंगेश चव्हाण जनतेच्या आशीर्वादावर आमदार झाले आहेत. आता कोणताही पक्ष राहिला नाही. कोण-कोणत्या पक्षात काम करतो, हे कोणालाच कळेना झालं आहे. पक्ष कोणताही असुद्या आपली माणसं आपल्याला सांभाळायची आहेत,'' असं इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं. 

टॅग्स :इंदुरीकर महाराजभाजपाजळगावशिवसेना