Join us
Daily Top 2Weekly Top 5

रतन टाटांना नेमका आजार तरी काय होता? अंतिम टप्प्यात काही अवयव झाले होते निकामी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 08:17 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी त्यांचे काही अवयव निकामी झाले, त्यामुळे त्यांना व्हेंटीलेटवर ठेवावे लागले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना वृद्धापकाळात होणाऱ्या व्याधींसाठी सोमवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात रक्तदाबाच्या त्रासामुळे दाखल करण्यात आल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले होते. चिंतेचे कारण नसल्याचे खुद्द टाटा यांनीच निवेदनाद्वारे जाहीर केले होते. मात्र, दोनच दिवसांत त्यांचे निधन झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी त्यांचे काही अवयव निकामी झाले, त्यामुळे त्यांना व्हेंटीलेटवर ठेवावे लागले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.  

व्हीआयपी व्यक्तींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या आरोग्य व उपचारांविषयी रुग्णालय ‘हेल्थ बुलेटिन’  काढते. बुलेटिन काढणे हा नियम नसला तरी अफवांना आळा घालण्याकरिता बुलेटिन काढले जाते. याकरिता रुग्णाची किंवा त्यांच्या वतीने नातेवाइकांची संमती आवश्यक असते. मात्र रुग्णालयाकडून कोणतेही बुलेटीन काढण्यात आले नव्हते.  

८६ वर्षीय टाटा यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. दोन दिवस त्यांच्यावर विविध वैद्यकीय विषयातील डॉक्टरांनी चाचण्या केल्या होत्या. त्यामध्ये हृदयविकारांशी संबंधित चाचणी करण्यात आली होती. रक्तदाबाच्या आजाराचा किडनीसह इतर अवयवानवर परिणाम झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

बुधवारी संध्याकाळपासून टाटा यांची तब्बेत ढासळण्यास सुरुवात झाल्याने त्यांना जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयातील वरिष्ठ  इंटेन्सिव्हिस्ट डॉ फारोख उडवाडिया  यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर नवीन इमारतीतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रुग्णालयातील डॉक्टर सर्व शर्तींचे प्रयत्न करून सुद्धा बुधवारी उशिरा ते उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे कळून आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

टॅग्स :रतन टाटाटाटा