Join us  

मतांची आघाडी किती, इतकाच काय तो प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 1:23 AM

१९७८ साली जनता पार्टीचा प्रयोग झाला. या प्रयोगातून भाजपाकडे आलेला बोरीवली विधानसभा मतदारसंघ आजतागायत भाजपाकडे आहे.

- गौरीशंकर घाळे१९७८ साली जनता पार्टीचा प्रयोग झाला. या प्रयोगातून भाजपाकडे आलेला बोरीवली विधानसभा मतदारसंघ आजतागायत भाजपाकडे आहे. विधानसभा असो की लोकसभा निवडणुका या मतदारसंघाने कायमच भाजपाला साथ दिली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तर मोदी लाट होती. त्यामुळे एका अर्थाने एकतर्फी निवडणूकच इथे पाहायला मिळाली.उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार गोपाळ शेट्टी यांना बोरीवली विधानसभेतून सर्वाधिक मते मिळाली. बोरीवली विधानसभा क्षेत्रातून शेट्टी यांना तब्बल १ लाख ४१ हजार ६४० मते मिळाली होती. तर, त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे संजय निरूपम यांना या क्षेत्रातून २८ हजार ४०९ मतांवर समाधान मानावे लागले होते. एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा अशी साधारण मुंबईतील मतदारसंघांची रचना आहे. त्यामुळे एका क्षेत्रातूनच भाजपाच्या शेट्टी यांना एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळाले. विशेष म्हणजे लोकसभेनंतर अवघ्या सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही बोरीवलीकरांनी भाजपालाच साथ दिली. लोकसभेतील भाजपा-शिवसेनेची युती विधानसभेपुर्वी फिस्कटली. तेंव्हाही विधानसभेसाठी भाजपाचे उमेदवार विनोद तावडे यांना १ लाख ८ हजार २७८ मते मिळाली. तर, त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उत्तमप्रकाश अगरवाल यांना अवघ्या २९ हजार ११ मतांवर समाधान मानावे लागले. तिस-या क्रमांकावरील मनसेला २१ हजार ७६५ तर चौथ्या क्रमांकावरील काँग्रेसला केवळ १४ हजार ९९३ मते मिळाली होती.बोेरीवलीचे आमदार विनोद तावडे राज्याच्या मंत्री मंडळातील वजनदार नेते आहेत. एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, ही सार्वत्रिक स्थिती आहे. दोन्ही नेते अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांमधील सुप्त संघर्ष सुरूवातीच्या काळात पाहायला मिळाला. अलीकडच्या काळात या दोन्ही नेत्यांनी आपापले परीघ ठरवून घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे पक्षांतर्गत सुप्त संघर्ष अथवा स्पर्धा निवडणुकीवर प्रभाव पाडेल, अशी स्थिती येथे नाही.मागील निवडणुकीत काँग्रेसकडून संजय निरूपम होते. विद्यमान खासदार असल्यामुळे त्यांना २८ हजार मते तरी मिळाली. यंदा मात्र उमेदवार कोण, असाच प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. निरूपम यांनी शेजारच्या लोकसभा मतदारसंघात धाव घेतल्याने सध्या इथे पोकळी आहे. स्थानिक दिग्गज उत्सुक नसल्याने सेलिब्रिटींची नावे पुढे केली जात आहेत. पण, बोरीवली क्षेत्रातून यंदा बिनचेहऱ्याच्या काँग्रेसला २८ हजार तरी मते घेता येतील का, असेच कोडे काँग्रेस सहानुभुतीदारांना पडला आहे. उत्तर मुंबईत भाजपाची थेट लढत ही शिवसेनेशीच राहिली आहे, पण युती झाल्यामुळे शिवसेनेचाही प्रश्न निकाली निघाला आहे. सध्या तरी मजबूत भाजपा आणि बिनचेहऱ्याची काँग्रेस अशीच बोरिवलीची स्थिती सध्यातरी आहे.राजकीय घडामोडीमराठी, गुजराथी आणि उत्तर भारतीय अशा विविध समाज घटकांतील सक्षम स्थानिक नेतृत्वाचा अभाव, हेच काँग्रेसचे खरे दुखणे आहे. जनतेचे छोटोमोठे विषय घेऊन संघर्षाचा पवित्र्यातील काँग्रेसजन येथे अभावानेच आढळतातउद्याने आणि मैदानांवरून विरोधक स्थानिक खासदारांवर आरोप करत असतात. मात्र, मोकळ्या जागा सुशोभित करतो, छोठ्या मोठ्या उद्यानांची कामे मार्गी लावतो. या जागांवर अतिक्रमण तर होऊ देत नाही, या शेट्टींच्या बिनतोड युक्तीवादला विरोधकांकडे उत्तर नसते.

टॅग्स :भाजपाशिवसेनाकाँग्रेस