Devendra Fadanvis: फडणवीस म्हणाले काही HMV पत्रकार, आदित्य ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 15:48 IST2022-11-01T15:45:45+5:302022-11-01T15:48:11+5:30
महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले आहेत, तरीही महाराष्ट्रात आमच्याविरुद्ध फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत आहे.

Devendra Fadanvis: फडणवीस म्हणाले काही HMV पत्रकार, आदित्य ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध महाविकास आघाडीचे नेते आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामध्ये, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते पुढे असून भास्कर जाधव, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे हे सरकारवर तोफ डागत आहेत. त्यातच, काही पत्रकार आणि लेखकही सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त करताना सरकारवरील रोष व्यक्त करत आहेत. नुकतेच, टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सरकाविरोधात जनमत तयार झालं आहे, त्यावरुन, फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी, काही पत्रकारांबद्दल त्यांनी HMV असा शब्दप्रयोग केला.
महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले आहेत, तरीही महाराष्ट्रात आमच्याविरुद्ध फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामध्ये, काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टीम आणि दुर्दैवाने एचएमव्ही पत्रकार, जे बोटावर मोजण्याइतके केवळ ४-५ आहेत. ह्यांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला आहे, असे फडणवीसांनी म्हटले. यावेळी, एक पत्रकाराने HMV चा अर्थ विचारला असता, His Masters Voice म्हणजे त्यांचा बुलंद आवाज असा अर्थ फडणवीसांनी सांगितला.
देवेंद्र फडणवीसांनी काही पत्रकारांना एचएमव्ही म्हटल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, हा पत्रकारांचा आणि पत्रकारितेचा अपमान आहे. जे पत्रकार आमच्याविरोधातही लिहितात, बोलतात, त्यांनी यांच्याविरोधात लिहिलं तर त्यांना His Master Voice म्हणणं हे अपमाजनक असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, नोकऱ्यांसाठी, विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या युवकांना शेंबडी पोरं म्हणणं बरोबर नाही. देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी शब्द मागे घेतले होते, आताही त्यांनी हे शब्द मागे घ्यावेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.