लोकलमधील गर्दीच्या ‘हॉट स्पॉट’वर उतारा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:30 IST2025-06-11T13:29:54+5:302025-06-11T13:30:11+5:30

Mumbai Suburban Railway: दुर्घटनेचा विचार करत भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून उपाययोजना करतानाच कुर्ला व घाटकोपरसाख्या रेल्वे स्थानकांतील लोकलच्या गर्दीवरही उतारा शोधावा, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

What is the antidote to crowded 'hot spots' in local trains? | लोकलमधील गर्दीच्या ‘हॉट स्पॉट’वर उतारा काय?

लोकलमधील गर्दीच्या ‘हॉट स्पॉट’वर उतारा काय?

मुंबई  - मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील दुर्घटनेनंतर प्रवाशांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, या घटनेला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आजच्या दुर्घटनेचा विचार करत भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून उपाययोजना करतानाच कुर्ला व घाटकोपरसाख्या रेल्वे स्थानकांतील लोकलच्या गर्दीवरही उतारा शोधावा, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

ऐन गर्दीत कुर्ला आणि घाटकोपर या दोन रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होते. सकाळी-संध्याकाळी येथे पाय ठेवायला जागा नसते. कुर्ला रेल्वे स्थानकापासून बीकेसी जवळ असून, घाटकोपर रेल्वे स्थानकातून प्रवाशांना मेट्रो गाठता येते. त्यामुळे या दोन्ही रेल्वे स्थानकांत प्रवाशांची संख्या अधिक आहे. घाटकोपर व कुर्ला रेल्वे स्थानकांवरील गर्दीमुळे प्रवाशांनी आता विद्याविहार स्थानकाचा पर्याय निवडला आहे. मात्र, येथे तर लोकलमध्ये प्रवेश करता येत नाही, अशी अवस्था आहे.

मध्य रेल्वेची अपुरी व्यवस्था हे अपघाताचे मुख्य कारण आहे. अपघातानंतर मिळणारी अपुरी आपत्कालीन वैद्यकीय मदत, रुग्णवाहिकांची व्यवस्था यामुळे प्रवाशांना अधिक त्रासाला तोंड द्यावे लागते. 
- संदेश कोलापटे

रेल्वे प्रशासनाची निष्क्रियता आता जीवघेणी ठरत आहे. सर्व लोकलमध्ये तातडीने ऑटोमॅटिक दरवाजे बसवले जावेत. लोकल फेऱ्या वाढवाव्या. प्रशासनाने ही घटना ‘अपघात’ म्हणून झटकण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. सुरक्षित प्रवास हा आमचा हक्क आहे.
- विनोद घोलप

कल्याण व कुर्ला दरम्यान मेल एक्स्प्रेससाठी पाचवी व सहावी अशा दोन स्वतंत्र मार्गिका असूनही तिसऱ्या व चौथ्या मार्गिकांवरून एक्स्प्रेस सुरू आहेत. आजही अपघातानंतर तेथून पुष्पक एक्स्प्रेस जाताना सर्वांनी पाहिली. मुळात या मार्गिकेवरून एक्स्प्रेस जाताच कामा नये. राज्य शासनानेही केवळ रेल्वेवर अवलंबून न राहता कल्याण-डोंबिवली-ठाणे रेल्वेमार्गाला समांतर थेट रस्ता, मेट्रो आणि सक्षम बससेवेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
- अक्षय महापदी 

दररोज लोकलने प्रवास करणाऱ्यांना हा मृत्यूचा सापळा वाटू लागला आहे. यावर उपाय म्हणून सर्व लोकल साध्या दरात वातानुकूलित करणे गरजेचे आहे.
 - संदीप पटाडे

Web Title: What is the antidote to crowded 'hot spots' in local trains?