जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी काय? मराठीचा मुद्दा महत्त्वाचा : कबुतरखाने, भटके कुत्रे, वृक्षतोड आणि हवा प्रदूषणाचा प्रश्न केंद्रस्थानी
By सीमा महांगडे | Updated: December 25, 2025 09:56 IST2025-12-25T09:55:46+5:302025-12-25T09:56:18+5:30
निवडून आल्यानंतर कोणते प्रश्न अथवा समस्या सोडवणार, कशाला प्राधान्य देणार, याची माहिती नागरिकांना देण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतात.

जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी काय? मराठीचा मुद्दा महत्त्वाचा : कबुतरखाने, भटके कुत्रे, वृक्षतोड आणि हवा प्रदूषणाचा प्रश्न केंद्रस्थानी
- सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा अद्याप झाली नसल्याने राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे गुलदस्त्यात ठेवले आहेत. रस्ते, पिण्याचे पाणी, पावसाळ्यात साचणारे पाणी, पार्किंग या प्रश्नांपेक्षा यंदा जाहीरनाम्यात वेगळे काय असणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.
मराठी माणूस, कबुतर व भटक्या कुत्र्यांमुळे होणारा त्रास, प्रकल्पांसाठी होणारी वृक्षतोड आणि कांदळवनांचा ऱ्हास, बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे, या प्रश्नांवर किती पक्ष लक्ष्य देणार आणि धोरणे आखणार, असा प्रश्न मुंबईतील नागरिक विचारत आहेत.
निवडून आल्यानंतर कोणते प्रश्न अथवा समस्या सोडवणार, कशाला प्राधान्य देणार, याची माहिती नागरिकांना देण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतात. त्यात नवीन विकासकामे करण्याची आश्वासनेही दिली जातात. सध्या विविध विकासकामे सुरू असून ती वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
हरित क्षेत्रासाठी ठोस प्रयत्न हवेत
कबुतरांमुळे उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्यांचा प्रश्न गेल्या काही दिवसांत बराच चर्चेत राहिला. पालिकेने प्रस्तावित केलेल्या कबुतरखान्यांना विरोध होत आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडविण्याची आवश्यकता आहे. सोबतच भटक्या कुत्र्यांचा होणारा त्रास आणि त्यासाठीचे शेल्टर्सचा प्रश्नही आगामी काळात प्राधान्याने सोडवण्याची आवश्यकता आहे.
अनेक विकास प्रकल्पांसाठी कांदळवन आणि झाडे तोडली जात असल्याने वृक्षप्रेमी आणि नागरिक विरोध करत आहेत. हा विरोध शांत करण्यासाठी भावी नगरसेवकांना मुंबईत हरित क्षेत्राची वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. सोबतच शहरातील प्रदूषणाच्या समस्येसाठी भावी नगरसेवक काय करणार आहेत, याची उत्तरेही मुंबईकरांना अपेक्षित आहेत.
फेरीवालामुक्त परिसर, बसला मार्गिका कधी?
मुंबई फेरीवालामुक्त कधी होणार?
बेस्ट बसला स्वतंत्र मार्गिका कधी मिळणार?
पार्किंग प्रश्न केव्हा सुटणार? त्याकरिता धोरण केव्हा येणार?
पावसाळ्यात सखल भाग जलमय होतात. ते कधी थांबवणार?
विविध भागांतील पाणीटंचाई आणि गढूळ पाण्याचा प्रश्न कधी सुटणार?
स्थानिक युवकांना नोकरी देण्याची मागणी
यंदा राजकीय पक्ष मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून महापालिका निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या जाहीरनाम्यात मराठी माणसासाठी काय असणार, याची उत्सुकता आहे. मुंबईत मराठी माणसांना घरे नाकारली जाणे,स्थानिक, मराठी युवा वर्गाला नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, मराठी शाळा या मुद्द्यांकडे मराठी मतदारांचे विशेष लक्ष असेल.