बँकॉकला नेमका कोणता उद्योग करायला चिरंजीव गेले होते?

By अतुल कुलकर्णी | Updated: February 16, 2025 05:52 IST2025-02-16T05:50:56+5:302025-02-16T05:52:02+5:30

मुलावर प्रेम असावे, तर आपल्यासारखे. मुलावर धाक असावा तर तो देखील आपल्यासारखा. मुलाला बापाची चप्पल घालता येऊ लागली की, बापाने मुलासोबत मित्रासारखे वागावे, असे म्हणतात. या न्यायाने आपण आपले चिरंजीव ऋषिकेश याच्याबाबतीत जे काही केले, त्याला तोड नाही.

What exactly did Chiranjeevi go to Bangkok to do? | बँकॉकला नेमका कोणता उद्योग करायला चिरंजीव गेले होते?

बँकॉकला नेमका कोणता उद्योग करायला चिरंजीव गेले होते?

अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई

आपण मंत्री प्रिय तानाजी सावंत,

जय महाराष्ट्र.

मुलावर प्रेम असावे, तर आपल्यासारखे. मुलावर धाक असावा तर तो देखील आपल्यासारखा. मुलाला बापाची चप्पल घालता येऊ लागली की, बापाने मुलासोबत मित्रासारखे वागावे, असे म्हणतात. या न्यायाने आपण आपले चिरंजीव ऋषिकेश याच्याबाबतीत जे काही केले, त्याला तोड नाही. आपण एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे. त्यामुळे काही लोक आपल्या विरुद्ध कटकारस्थान करतील. अनेक शंका-कुशंका व्यक्त करतील. मात्र, तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. आपले विरोधक आपल्यावर खूप प्रेम करतात हे लक्षात ठेवा... गावात या विषयावर चर्चा सुरू होती, तेव्हा शामरावांनी आम्हाला काही प्रश्न विचारले. भविष्यात हे प्रश्न आपल्याला त्रास देतील. म्हणून आत्ताच तुम्हाला कळवून ठेवतो. म्हणजे कोणी विचारले, तर तुम्हाला उत्तरे देता आली पाहिजे. तुमची अडचण होऊ नये, या प्रेमापोटी हे पत्र आपल्याला लिहीत आहे.

पुणे पोलिसांना निनावी फोन करून अपहरणाची माहिती कोणी दिली? पोलिसांना चुकीची माहिती देणे हा भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा होतो का?, त्यामुळे हा फोन नेमका कोणी केला?, आपली अडचण करण्याचा तर यामागे डाव नव्हता ना, हे आधीच तपासून ठेवा. परदेशात जाण्यासाठी जर खासगी विमान करायचे असेल, तर त्याला दिल्लीपासून गल्लीपर्यंत परवानग्या घ्याव्या लागतात. आपल्या मुलाला या परवानग्या पटापट मिळाल्या... आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये सेतू केंद्रावर रेशन कार्डसाठी महिनाभर चकरा माराव्या लागतात, असे जर कोणी म्हणाले, तर त्याचे उत्तर तयार ठेवा. उगाच आपली अडचण नको... आपल्या चिरंजीवांनी बँकॉकला जाण्यासाठी घेतलेल्या सगळ्या परवानग्यांची एक फाइलच बनवून ठेवा. बँकॉकमध्ये ते कुठे राहणार होते? कोणत्या उद्योग वाढीचा विचार त्यांच्या मनात होता? याचेही उत्तर तयार ठेवलेले बरे. एका खासगी व्यक्तीसाठी चार्टर फ्लाइट थांबवणे किंवा परत वळवणे यासाठी डीजीसीएचे काही नियम आहेत, असे शामराव म्हणत होते. ते नियम कोणते आहेत? या सगळ्या गोष्टींचे पालन केले होते की नाही, हे आपल्या जवळ असलेले बरे.

ऋषिराज वयाने सज्ञान आहेत. त्यांना त्यांचे भले वाईट कळते, त्यामुळे त्यांनी ६० ते ७० लाख खर्च करून विमान बुक केले असेल, तर त्याविषयी खरे तर एवढा गोंधळ करण्याची गरज नव्हती. त्यांनी दिलेले पैसे, त्यासाठी केलेली मेहनत हे कोणाला दिसत नाही. त्यामुळे या उत्पन्नाचे स्राेतदेखील लॅमिनेट करून ठेवा. कोणीही विचारले तर खाडकन देता आले पाहिजेत. ते वयाने सज्ञान नसते आणि बँकॉकला त्यांनी काही उद्योगात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला असता, तर प्रश्न उपस्थित झाले असते... पण ते सज्ञान

असल्यामुळे बोलणाऱ्याला बोलू द्या, त्याकडे लक्ष देऊ नका..!

या प्रकरणात सरकारी यंत्रणेचा आणि पोलिस अधिकाऱ्यांचा दुरुपयोग केला गेला, असाही आरोप आपले विरोधक करत आहेत. लोकसेवकाने यंत्रणा व अधिकाराचा दुरुपयोग केला, तर गुन्हा होतो का. सोशल मीडियावर खोटी माहिती किंवा अफवा पसरवली असेल, तर आयटी कायदा २००० च्या कलम ६६ डी आणि ५०५ लागू होते. जर चार्टर कंपनीवर दबाव आणून फ्लाइट थांबवण्यात आले असेल, तर कॉन्ट्रॅक्ट आणि कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच्या उल्लंघनाचा मुद्दा येऊ शकतो का? असेही शामरावांना कोणीतरी विचारले. हे सगळे आपल्या डोक्यापलीकडचे आहे. तुम्हीच याचा तपशील काढून ठेवलेला बरा...

आपल्या मुलाच्या अपहरणाचा बनाव केला गेला की, गैरसमज निर्माण केला गेला? पुणे पोलिसांना निनावी फोन कोणी आणि का केला? ही अफवा पसरवण्यामागे काही देश विघातक राजकीय कारणे आहेत का..? आपले चिरंजीव बँकॉकला चालले होते, त्यामुळे चीन किंवा रशियाचा तर यामागे काही हात नाही ना..? चार्टर फ्लाइटसाठी किती दिवस आधी बुकिंग करावे लागते?, आयत्यावेळी बुकिंग केले तर जास्तीचे पैसे लागतात का?, धाराशिवमध्ये बसून विमानाचे तिकीट काढणारी एक कंपनी वीस पंचवीस हजारांत प्रत्येकाचे तिकीट काढून देऊ शकली असती, असेही सांगत होती, त्यासाठी एवढे पैसे खर्च करायची गरज होती का..? नेमका कोणता उद्योग बँकॉकमध्ये आपली वाट पाहत होता..? अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया वापरायला देऊ नये, असा कायदा ऑस्ट्रेलियाने केला. आपल्या देशात सज्ञान मुलांनाही विदेशवारी करताना आई-वडिलांना सांगणे सांगण्याचे नैतिक धडे का दिले जातात..? अशा एक ना दोन असंख्य प्रश्नांची सरबत्ती शामरावांनी आमच्यावर केली. हे प्रश्न उद्या जर कोणी माहिती अधिकारात विचारायचे ठरवले, तर ते माहिती अधिकारात कसे बसत नाहीत, याचाही कायदेशीर सल्ला घेतला पाहिजे, असे शामरावांना वाटत होते... अर्थात ते आपल्या प्रेमापोटी म्हणत होते...

जाता जाता : नागपूरहून कोल्हापूरला जाताना शामरावांनी काढलेले खासगी बसचे तिकीट प्रवास रद्द केल्यामुळे परत मिळाले होते. आपलाही दौरा रद्द झाला, त्यामुळे आपण भरलेले लाखो रुपये परत मिळाले का..? शामरावाच्या मुलाचे पैसे बँकॉकला गेल्यावर उडाले, असे त्यांनी घरी सांगितले होते. आपले तर तसे झाले नाही ना... काळजी वाटली म्हणून विचारले...

               तुमचाच, बाबूराव.

Web Title: What exactly did Chiranjeevi go to Bangkok to do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.