Join us  

पालकांचे मत काय? एप्रिलनंतरच शाळा सुरू करायला हव्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 6:21 AM

Corona School news या सर्वेक्षणात शाळा सुरू करण्याबाबत पालकांची मते जाणून घेण्यात आली. तसेच लस उपलब्ध झाल्यास ती विद्यार्थ्यांना टोचून घेणार का, याबाबत देखील पालकांची मते नोंदविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून भारतात सर्वात प्रथम शाळा बंद करण्यात आल्या. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत गेल्याने संपूर्ण वर्षभर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. लॉकडाउनच्या काळात शिक्षणात खंड पडू नये यासाठी शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण देखील सुरू झाले. तरीही सत्तर टक्के पालकांना एप्रिलनंतर शाळा सुरु व्हाव्यात असे वाटते, लोकल सर्कल्सच्या वतीने एक सर्व्हे करण्यात आला आहे. त्याद्वारे हे स्पष्ट झाले आहे. 

या सर्वेक्षणात शाळा सुरू करण्याबाबत पालकांची मते जाणून घेण्यात आली. तसेच लस उपलब्ध झाल्यास ती विद्यार्थ्यांना टोचून घेणार का, याबाबत देखील पालकांची मते नोंदविण्यात आली. यात भारतातील विविध राज्यांमधील २२४ जिल्ह्यातील १९ हजार पेक्षा जास्त पालकांचा सर्वे करण्यात आला आहे.यामध्ये  ६९% पालकांनी शाळा २०२१ च्या एप्रिल नंतर सुरू व्हाव्यात असे म्हटले. लोकल सर्कल्सने सप्टेंबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात ३४% पालक एप्रिल नंतर शाळा सुरू करण्याच्या बाजूने होते. आता ती संख्या दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे. तर २३ % पालकांनी शाळा जानेवारी महिन्यातच सुरू व्हाव्यात असे म्हटले. 

या सर्वेक्षणात शालेय मुलांसाठी लस उपलब्ध करून दिल्यास आपण ती आपल्या मुलांना देण्याचा विचार कराल का? असा प्रश्न पालकांना विचारण्यात आला. यावेळी २६% टक्के पालकांनी लस उपलब्ध झाल्यास ती मुलांना टोचून घेणार असे म्हटले. यावेळी १२% पालकांनी मुलांना लस देण्यास नकार दिला. तर उर्वरित ५६% पालकांनी लसीकरणाचे तीन महिने वाट बघून निर्णय घेऊ असे सांगितले.

लसीकरणाबाबत प्रोत्साहित करा  n वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अलीकडेच शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात सामाजिक अंतर राखणे, हात धुणे, स्वच्छता, हवेशीर आसन व्यवस्था अशा अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. तसेच शिक्षकांना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना लसीकरणाबाबत प्रोत्साहित करण्याचे देखील म्हटले आहे. 

टॅग्स :शाळाकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस