Join us  

दूषित पाणी प्यायल्याने कोणकोणते आजार होतात? पावसाळा तोंडावर, डॉक्टर म्हणतात पाणी उकळून प्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 12:55 PM

डीहायड्रेशन होऊ नये म्हणून दिवसाला किमान तीन ते साडेतीन लीटर पाणी प्यायला हवे.

मुंबई : कडक उन्हाळा असल्याने पाणी पिण्याचे प्रमाणही प्रचंड आहे. उकाड्यामुळे अक्षरश: घामाने आंघोळ होते. त्यामुळे वारंवार तहान लागते. डीहायड्रेशन होऊ नये म्हणून दिवसाला किमान तीन ते साडेतीन लीटर पाणी प्यायला हवे; परंतु मुंबईत अनेक भागात पाणीगळती तसेच दुरुस्तीच्या कामांमुळे दूषित पाण्याचा पुरवठा होतो. अशावेळी पोटाचे गंभीर आजार होऊ नये यासाठी पाणी उकळूनच पिणे केव्हाही उत्तम, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. 

पावसाळ्यात आरोग्य सांभाळापावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य सांभाळा असा सल्लाही डॉक्टर वारंवार देतात. अनेक भागांत पुराच्या पाण्यामुळे किंवा पाणीगळतीमुळे दूषित किंवा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. अशावेळी पावसाळ्यात पाणी केव्हाही उकळून पिणेच चांगले असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

कावीळ अन् अमिबियासिसचा धोकादूषित पाण्यामुळे हिपॅटायटीस ए आणि ई असे जीवघेणे आजारही होऊ शकतात. त्याचबरोबर अमिबियासीसचा धोकाही संभवतो. मळमळ, अतिसार, अनपेक्षित वजन कमी होणे, पोटदुखी, ताप अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

हे गंभीर आजार जीवावर बेततील  दूषित पाण्यामुळे कॉलरा, डायलिया तसेच जुलाब झाल्यामुळे डीहायड्रेशन होऊ शकते.   गॅस्ट्रो, लेप्टोपायरेसिस, पोलियो, विषमज्वर असे गंभीर आजारांनाही तोंड द्यावे लागू शकते.  सगळ्यात गंभीर आजार म्हणजे अमिबीयासीसचाही सामना करावा लागू शकतो.   त्यामुळे परिसरात गढूळ किंवा दूषित पाणी येत असेल तर तातडीने विभागातील पालिका अधिकाऱ्याच्या ते निदर्शनास आणून द्यायला हवे.   त्याचबरोबर पाणी उकळूनच प्यायला हवे.   हल्ली पाणी शुद्ध करणाऱ्या मशीनचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो; परंतु पाणी उकळल्यामुळे त्यातील बॅक्टेरिया मरतात आणि पाणी सुरक्षित होते, याकडेही डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.

आजारात काय काळजी घ्यावी?  दूषित पाण्यामुळे अतिसार किंवा जुलाब असा त्रास जाणवल्यास अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यासह आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.   अशा रुग्णांनी हलका किंवा द्रवस्वरुपातील आहार घ्यावा.   अशा आजारांत तोंडाची चवच निघून जाते. त्यामुळे भाज्यांचे सूप, भाताची पेज, वरणावरील पाणी असा आहार फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर डाळिंबाचे दाणे, संत्री आणि मोसंबीचे सेवनही उत्तम असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.

ही लक्षणे दिसल्यास गांभीर्याने घ्यावेदूषित पाण्यामुळे पोटात मुरडा येणे, वारंवार पोटात दुखणे, उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा आजारांकडे दुर्लक्ष केले तर आजार वाढत जाऊन पुढे किडनी फेल होण्याचाही धोका संभवतो. डीहायड्रेशन झाल्यास लिंबूपाणी किंवा ओआरएस असे घरगुती उपाय करून डॉक्टरांकडून त्वरित उपचार घ्यावेत.- डॉ. मधुकर गायकवाड(सहयोगी प्राध्यापक, मेडीसी, जेजे रुग्णालय) 

टॅग्स :पाणीपाऊस