Join us  

प्रवाशांच्या जनजागृतीसाठी पश्चिम रेल्वेचे ‘तिकीट टू सुरक्षा’ अभियान वेगात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 6:04 AM

अपघात रोखण्याचा प्रयत्न; रेल्वे रूळ न ओलांडण्याचे आवाहन

मुंबई : उपनगरीय लोकलवरील प्रवासी अपघात रोखण्यासाठी तसेच सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने ‘तिकीट टू सुरक्षा’ अभियान वेगात राबविण्यास सुरुवात केली आहे. समाजमाध्यमांचा कल्पकतेने वापर करीत धावत्या लोकलमध्ये प्रवेश करू नये, रेल्वे रूळ ओलांडू नये, आपत्कालीन परिस्थितीशिवाय नाहक साखळी ओढू नये अशा सूचना करण्यात आल्या.पश्चिम रेल्वेच्या अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटवरून ‘#तिकीट टू सुरक्षा’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचाही वापर करण्यात येत आहे. धावत्या लोकलमध्ये, लोकलच्या दरवाजावर (फूटबोर्ड), फलाटांच्या टोकावर उभे राहून ‘सेल्फी’ घेणे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे, याची जाणीव करून देत ‘अपघात कुठेही होऊ शकतो’ असे टिष्ट्वट करण्यात आले आहे. प्रवासी जागरूक अभियानाला रेल्वे प्रवाशांनीदेखील टिष्ट्वट करीत पसंती दर्शवली आहे. गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर बाहेर पडते. या काळात रेल्वे स्थानकांवर धावती लोकल पकडण्याचा स्टंट करणे जिवावर बेतू शकते, यामुळे धावत्या लोकल पकडण्याचा मोह टाळण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे. रेल्वे रूळ ओलांडणे हा गुन्हा असून रेल्वे रूळ ओलांडताना अपघातात मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असल्याचे टिष्ट्वटही रेल्वेने केले आहे....तर बेड्या ठोकणाररेल्वे प्रवाशांकडून काही वेळा गरज नसतानाही केवळ ट्रेन थांबविण्यासाठी साखळी ओढली जाते. यामुळे अन्य ट्रेनच्या वेळापत्रकावरही परिणाम होतो. सोबतच मोटारमन आणि गार्ड यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नाहक साखळी ओढल्यास दोषी प्रवाशांना बेड्या ठोकण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाने टिष्ट्वट केले असून, सध्या ते प्रवाशांच्या चर्चेचा विषय बनले आहे.

टॅग्स :लोकलरेल्वेपश्चिम रेल्वे