Mumbai AC Local: पश्चिम रेल्वेची एसी लोकल उन्हाळ्यात तिसऱ्यांदा बिघडली, प्रवाशांना धरलं जातंय गृहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:33 IST2025-04-25T16:31:22+5:302025-04-25T16:33:01+5:30
Mumbai AC Local Train Issue: पश्चिम रेल्वेने गुरुवारी एसी लोकलच्या १२ फेऱ्या रद्द करुन त्याऐवजी नॉन-एसी सेवा चालवल्याने एसी लोकलच्या प्रवाशांना घामाघूम होत प्रवास करावा लागला.

Mumbai AC Local: पश्चिम रेल्वेची एसी लोकल उन्हाळ्यात तिसऱ्यांदा बिघडली, प्रवाशांना धरलं जातंय गृहीत
मुंबई: पश्चिम रेल्वेने गुरुवारी एसी लोकलच्या १२ फेऱ्या रद्द करुन त्याऐवजी नॉन-एसी सेवा चालवल्याने एसी लोकलच्या प्रवाशांना घामाघूम होत प्रवास करावा लागला. बुधवारीही अशाच एसी सेवा रद्द केल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात तिसऱ्यांदा एसी लोकलमध्ये प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ८ एसी लोकल आहेत. त्यापैकी ७ गाड्या नियमित सेवेत असून प्रत्येक एसी लोकलच्या दिवसभरात १५ ते १७ सेवा चालवल्या जातात. यानुसार दररोज सरासरी १०९ एसी फेऱ्या उपलब्ध होतात. मात्र, बुधवारी एका एसी गाडीत बिघाड झाला. प्रशासनाला नाइलाजाने त्या वेळेत नॉन-एसी फेऱ्या चालवाल्या लागल्या. त्यामुळे चर्चगेट ते बोरीवली, भाईंदर आणि विरार दरम्यान एसी लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना उकाड्यात प्रवास करावा लागला.
प्रवाशांना धरले गृहीत
१. बिघाड झालेला एसी रेक गेल्या महिन्यांत तिसऱ्यांदा बिघडला आहे. पश्चिम रेल्वेकडून देखभाल-दुरुस्ती नीट होत नसल्याने असा प्रकार घडत असल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
२. प्रवाशांना एसीच्या पैशात नॉन-एसीने जाण्यास भाग पाडले जात असून प्रशासनाकडून प्रवाशांना वारंवार गृहीत धरत असल्याचा रोष व्यक्त केला जात आहे.
सेवा नॉन-एसी, पण उदघोषणा एसीची
बुधवारी विरार स्थानकावर सकाळी ८ वाजून ३३ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ नॉन-एसी ट्रेन येत असताना, घोषणेत मात्र तेथे एसी ट्रेन तिथे येणार आहे, असे सांगण्यात येत होते.
रेल्वे प्रशासनाच्या संवाद आणि समन्वयातील अशा गंभीर त्रुटींबाबत प्रवाशांनी समाज माध्यमांवर टीका केली.
आजही १३ एसी लोकल नॉन एसी
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते बोरीवलीदरम्यान धावणाऱ्या १३ एसी लोकल सेवा शुक्रवार २५ एप्रिल रोजी नॉन एसी म्हणून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
१०९ एसी लोकलच्या रोजच्या एकूण फेऱ्या
यापूर्वीचा एसी लोकलमध्ये २७ आणि २८ मार्च, ९ एप्रिल, २३ आणि २४ एप्रिल रोजी बिघाड झाला होता.