Join us  

लॉकडाऊन काळात पश्चिम रेल्वेची भंगारातून ४५ कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 6:30 PM

भारतीय रेल्वेत सर्वाधिक भंगार विकून पश्चिम रेल्वेचा विक्रम

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाने लॉकडाऊन काळात रेल्वे परिसरातील भंगार विकून ४५ कोटींची कमाई केली आहे. लोह, स्टील, अ‍ॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री केली आहे. यासह जुने डबे, माल डबे, रेल्वे इंजिन, चाके यांची विक्री केली. भारतीय रेल्वेतील सर्व विभागापैकी सर्वाधिक भंगार विक्री पश्चिम रेल्वेने केली. त्यामुळे पश्चिम रेल्वेने लॉकडाऊन काळात भंगार विकून नवा विक्रम नोंदविला आहे.  

लॉकडाऊनच्या एप्रिल, मे महिन्यात रेल्वे कारखाने आणि रेल्वे मार्गावर असलेल्या भंगाराला उचलण्याचे काम करण्यात आले. तर, जून महिन्यात भंगार विक्री सुरु करण्यात आली. यामध्ये जुलै महिन्यापर्यत ४५ कोटी रुपयांची कमाई पश्चिम रेल्वेने केली आहे. पश्चिम रेल्वेद्वारे महिन्यातून दोन वेळा महालक्ष्मी, साबरमती, प्रताप नगर डेपो; मुंबई, बडोदा, रतलाम, अहमदाबाद, राजकोट आणि भावनगर विभागातून ऑनलाईन विक्री करण्यात आली. यामध्ये देशातील कोणताही व्यक्ती यामध्ये भाग घेऊ शकत होता. जुने डबे, माल डबे, रेल्वे इंजिन, चाके, रेल्वे रूळ यांची विक्री केली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

भारतीय रेल्वेमध्ये ‘शून्य भंगार’ मोहिम सुरू आहे. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल आणि मुख्य सामग्री व्यवस्थापक जे. पी. पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम रेल्वेच्या सामग्री प्रबंधन विभागाने शून्य भंगार मोहिमेंतर्गत ही कार्यवाही केली. या मोहिमेतंर्गत २०१९-२०२० या आर्थिक वर्षात ५३३ आणि २०१८-१९ या वर्षात भंगार विकून ५३७ कोटी रुपये कमविले होते. पश्चिम रेल्वे मार्गावरील कारखान्यातील १०० टक्के, रेल्वे स्थानकावरील ६५ टक्के, शेड आणि डेपो मधील ५० टक्के आणि ३० टक्के रेल्वे विभागातील भंगार विकण्यात आले आहे. 

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉककोरोना वायरस बातम्यारेल्वेलोकलमुंबई