मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वक्तशीरपणामध्ये सुधारणा झाली आहे. एप्रिल २०२४ पासून फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पश्चिम रेल्वेचा एकूण वक्तशीरपणामध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली असून, तो ८२ टक्क्यांवरून आता ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. रेल्वेच्या कार्यप्रणालीत सुधारणा केल्यामुळे आणि विविध तांत्रिक अडचणी दूर केल्यामुळे ही वाढ झाली असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरांतील लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, विविध तांत्रिक अडथळ्यांमुळे वेळापत्रक वारंवार कोलमडते. परिणामी, लोकल विलंबाचा प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागत होता. ही परिस्थिती सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलली.
पश्चिम रेल्वेने चालू आर्थिक वर्षात वक्तशीरपणा ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी तांत्रिक सुधारणा, आधुनिकीकरण, मनुष्यबळाचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि यंत्रणांची नियमित देखभाल यावर भर दिला जाणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात दररोज एकूण १,४१० लोकल फेऱ्या धावतात. त्यापैकी १०९ फेऱ्या एसी लोकलच्या असून, उर्वरित १,३०१ फेऱ्या साध्या लोकलच्या आहेत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता एसी लोकलच्या फेऱ्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.
यामुळे झाली सुधारणा
रेल्वे रुळांची नियमित तपासणी, तांत्रिक देखभाल, लोकल आणि ओव्हरहेड वायरची स्थिती सुधारण्यावर भर देण्यात आला. सिग्नल यंत्रणेतील बिघाड कमी करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. तसेच, आपत्कालीन परिस्थिती साखळी खेचण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती केली गेली. या उपायांमुळे लोकल गाड्या वेळेवर धावू लागल्या आणि वक्तशीरपणा वाढला.