तीन हजार ६९९ प्रकल्पांना खरेच ओसी दिली का?; ‘महारेरा’चे प्राधिकरणांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 08:11 IST2025-04-25T08:10:25+5:302025-04-25T08:11:05+5:30
खात्री करून वस्तुस्थिती कळविण्याचे ‘महारेरा’चे प्राधिकरणांना पत्र

तीन हजार ६९९ प्रकल्पांना खरेच ओसी दिली का?; ‘महारेरा’चे प्राधिकरणांना पत्र
मुंबई- महारेराने व्यपगत (लॅप्स) प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसींना प्रतिसाद म्हणून तीन हजार ६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि त्यांना संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून मिळालेले भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) महारेराच्या वेबसाइटवर अपलोड केल्याचे नमूद केले आहे. मात्र, या प्रकल्पांना खरेच भोगवटा प्रमाणपत्र दिले गेले का, याची खात्री करून त्याबाबतची वस्तुस्थिती कळवावी, अशी विनंती महारेराने संबंधित प्राधिकरणांना केली आहे.
कल्याण-डोंबिवली येथील गृहनिर्माण प्रकल्पातील फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर भोगवटा प्रमाणपत्रे महारेराने प्राधिकरणांकडून प्रमाणित करून घेण्याचे ठरविले आहे. याचा भाग म्हणून संबंधित प्राधिकरणांना या प्रकल्पांचा तपशील पाठवून प्रकल्पांना खरेच भोगवटा प्रमाणपत्र जारी केले का, याची खात्री करून वस्तुस्थिती पत्र मिळाल्यापासून महारेराला १० दिवसांत कळविण्याची विनंती केली. या कालावधीत प्राधिकरणांकडून ज्या प्रकल्पांबाबत प्रतिसाद मिळणार नाही त्यांचे भोगवटा प्रमाणपत्र खरे आहे, असे गृहीत धरले जाईल.
नोंदणी करणे आवश्यक
गृहनिर्माण प्रकल्पाला अटींसापेक्ष घर विक्रीसाठी महारेराकडे प्रकल्पाची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. प्रकल्प उभारणीच्या काळात तीन महिन्यांचा प्रगती अहवाल, वार्षिक अहवाल सादर करावे लागतात. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्राधिकरणाचे भोगवटा प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.