अतुल कुलकर्णी -मुंबई : मराठा आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलक आले. आझाद मैदान आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचंड गर्दी झाली. कोणत्याही क्षणी, काहीही होऊ शकेल असे सतत वाटत असताना मुंबई पोलिसांनी ज्या पद्धतीने सगळी परिस्थिती हाताळली आणि महापालिकेने एका रात्रीत मुंबई पहिल्यासारखी स्वच्छ केली त्याबद्दल ते शाब्बासकीला पात्र आहेत. महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती आणि त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने ६ दिवस काम करत होती त्याला तोड नव्हती.
एक दिवसाची परवानगी देण्यात आलेली असताना आंदोलनाला रोज रात्री मुदतवाढ मिळत गेली. पाच दिवस आंदोलन चालू राहिले. लोक मोठ्या प्रमाणावर येतच राहिले. त्यात राज्यभरातून आलेल्या आंदोलकांना पावसामुळे बसायलाही जागा नव्हती. आजूबाजूच्या खाऊ गल्यांतील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. त्यामुळे आंदोलकांच्या संतापात भर पडत गेली. ५ हजार लोकांना परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात ११ हजारांहून अधिक गाड्या मुंबईत आल्या. जवळपास १२०० गाड्या नवी मुंबईत थांबवल्या गेल्या. दक्षिण मुंबईत ५ हजारांहून अधिक गाड्या आल्या. गर्दीचा आकडा १० ते १५ हजार होईल असा महापालिकेचा अंदाज हुकला. प्रत्यक्षात अवघ्या २ दिवसांत ४० ते ५० हजार लोक आले. एवढ्या सगळ्यांसाठी टॉयलेट, बाथरूम, अंघोळ, पिण्याचे पाणी यांची सोय करण्याचे मोठे आव्हान पालिकेपुढे उभे राहिले. त्यासोबतच खाद्यपदार्थांची पाकिटे आणि होणारा कचरा हा एक वेगळाच विषय होऊन बसला.
मराठा आरक्षणासाठी जिद्दीने मुंबईत आलेल्या अनेक आंदोलकांसोबत या सर्व आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक गोंधळ घालतील अशी खबर पोलिसांना मिळू लागली. याच कालावधीत मुंबईत वेगवेगळ्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक विविध गणेश मंडळांना भेट देतात. आझाद मैदानातील आंदोलनामुळे गणेशोत्सवाचे नियोजन गडबडले. तिथला बंदोबस्त कमी करून आझाद मैदानात वळविण्यात आला. त्यामुळे आंदोलन आझाद मैदानात असले तरी त्याचा प्रभाव आणि ताण शहरातील उर्वरित पोलिस मनुष्यबळावर पडला. लालबाग, चिंचपोकळी येथील अतिरिक्त मनुष्यबळही दक्षिण मुंबईत हलवण्यात आले होते. आंदोलकांनीही रात्रीच्या वेळी याठिकाणी दर्शनासाठी धाव घेतल्याने येथील बंदोबस्तावरही ताण आला. अशावेळी अपुऱ्या मनुष्यबळावर अपर पोलिस आयुक्त विक्रम देशमाने, पोलिस उपायुक्त रागसुधा आर. यांनी येथील धुरा सांभाळली.
अनेक कार्यकर्ते पहिल्यांदा मुंबईत आले होते. त्यांचा उत्साह आणि त्यातील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा गोंधळ पोलिसांच्या संयमाची वारंवार परीक्षा घेत होता. कुठेही काठी उगारायची नाही, अशा स्पष्ट सूचना होत्या. अनेक अधिकारी, पोलिस कॉन्स्टेबल तर ७२ तास ड्यूटीवर होते.
वेगवेगळ्या जागी जे पोलिस नेमले होते त्यांना त्याच जागी राहण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये एक नाते तयार झाले. ते नाते इतके घट्ट झाले की पोलिस उपायुक्त निमित गोयल यांचा वाढदिवस साजरा करायला पोलिस सहकाऱ्यांनी आणलेला केक रस्त्यावरच कापला गेला तेव्हा आंदोलकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आंदोलनाची यशस्वी सांगता झाल्यानंतर गावी जाणारे अनेक कार्यकर्ते पोलिसांची गळाभेट घेऊन जाताना दिसले.
मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि त्यांची टीम सोयीसुविधा देण्यासाठी रस्त्यावर उतरली. उपायुक्त किरण दिघावकर, जयदीप मोरे, चंदा जाधव, अग्निशमन विभागाचे प्रमुख रवींद्र अंबुलगेकर या अधिकाऱ्यांनी कचरा, पाणी, स्वच्छतेपासून प्रत्येक गोष्टीसाठी झटत होती. कचरा गोळा करणारे लोक समोर असतानाही काहींनी मुद्दाम रस्त्यावर कचरा टाकला, तरी कुठेही चिडून न जाता कर्मचारी काम करत होते. साफसफाई करणारे शेकडो हात यासाठी राबत होते.
मुंबई महापालिकेच्या आणि पोलिस कंट्रोल रूममध्ये असणाऱ्या सीसीटीव्हीवर अधिकाऱ्यांना अनेक गोष्टी दिसत होत्या. दक्षिण मुंबईत कॅमेऱ्यांचे दाट जाळे आहे. पोलिस आणि अधिकारी सगळ्या गोष्टी बघत होते. पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी पोलिस नियंत्रण कक्षातून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. मुंबईत एखादी दुर्घटना घडली किंवा मुंबईवर संकट आले तर मुंबईकरांचे स्पिरिट म्हणून मुंबईकरांचे कौतुक केले जाते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आणि महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी संयमाचा नवा धडा मुंबईकरांना शिकवला. त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत.