अटल सेतूवर स्वागत; शंभरच्या पुढे गाडी चालवू नका; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची वाहनधारकांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 07:03 IST2024-01-14T06:25:49+5:302024-01-14T07:03:19+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचे (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) उद्घाटन शुक्रवारी झाले.

अटल सेतूवर स्वागत; शंभरच्या पुढे गाडी चालवू नका; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची वाहनधारकांना विनंती
मुंबई : ...सर अटल सेतूवर आपले स्वागत आहे. हा रस्ता आपल्याला शिवडीला घेऊन जाईल. सर, शंभरच्या पुढे गाडी चालवू नका. प्रवासात मध्ये कुठेही थांबू नका. हॅपी अँड सेफ जर्नी...असे स्वागत प्रवाशांचे पहिल्याच दिवशी अटल सेतूच्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी केले आणि प्रवाशांचा अटल सेतूवरील प्रवास पहिल्याच दिवसापासून सुसाट सुरू झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचे (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) उद्घाटन शुक्रवारी झाले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी सकाळी ८ वाजता अटल सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी शिवडी आणि नवी मुंबईच्या दोन्ही टोकांकडून अटल सेतूवरून प्रवास करण्यासाठी प्रवासी उत्सुक होते. नवी मुंबईकडील टोल नाक्याच्या प्रवेशद्वारावर दाखल प्रवाशांचे नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून स्वागत केले जात होते. त्यांना सूचना दिल्या जात होत्या. तर शिवडीकडील बाजूकडून सेतूवर जाणारे प्रवासीही उत्सुक होते.
बहुतांश प्रवाशांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या माहितीनुसार आणि प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अटल सेतूला पहिल्याच दिवशी पसंती देण्यात आली. अनेक प्रवाशांनी प्रवास २० मिनिटांवर आल्याने पंतप्रधानांना याचे श्रेय देत टोलही ठीक असल्याची प्रतिक्रिया दिली. तर काही प्रवासी दहिसर येथून या सेतूवर प्रवास करण्यासाठी दाखल झाले होते.
ट्रेडिंगमध्ये सेतू
गेल्या दोन दिवसांपासून अटल सेतू सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये असून, सेतूवर मुंबईकरांकडून स्तुतीसुमने उधळली जात आहेत. सेतूची एरिअल व्ह्यू दिसणारी चित्रे आणि व्हिडीओ पोस्ट केली जात असून, देशातील सर्वांत मोठा सागरी मार्ग म्हणून सेतूवर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.
अटल सेतूवरून शनिवारी ८ हजार १६९ वाहनांनी प्रवास केला. प्रवास करत असताना प्रवाशांनी मध्येच वाहन थांबवून सेल्फी घेऊ नये किंवा फोटो काढण्यासाठी वाहनातून खाली उतरू नये. वाहतूकीचे नियम पाळावेत, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. अटल सेतूवर काही वाहनचालकांनी सेल्फी काढल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर हे आवाहन करण्यात आले. (छाया : दत्ता खेडेकर)
दक्षिण भारतासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा यांचे अंतर कमी होणार आहे. हा सेतू अभियांत्रिकी आविष्कार आहे. सेतूवरून प्रवास करणे सगळ्यांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. हा क्षण अनुभवताना वाहन वेग मर्यादा लक्षात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करावा आणि नियमांचे पालन करावे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री