Join us  

नववर्षाचे स्वागत घरूनच; जल्लोष मर्यादीत ठेवण्यात यश, आतषबाजीलाही आळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2021 1:52 AM

जल्लोष मर्यादीत ठेवण्यात यश, आतषबाजीलाही आळा

मुंबई : मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागतासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मर्यादा घालून दिल्यामुळे शहरांतील रस्त्यांवर मोठ्या संख्येने होणारी गर्दी यंदा दिसली नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत आवश्यक प्रकरणांमध्ये कारवाई केल्याने या वर्षीचा जल्लोष मर्यादेत ठेवण्यात राज्य प्रशासनाला यश आले. लोकांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांना भरघोस साथ दिल्याचेही दिसून आले. रात्री बाराच्या ठोक्याला नेहेमी होणारी फटाक्यांची आतषबाजीही यावेळी आटोक्यात होती.

३१ डिसेंबरच्या रात्री राज्यातील पोलीस कारवायांचा आढावा घेतला असता मद्यप्राशन, विनाहेल्मेट, विनासिटबेल्ट, ट्रिपलसीट, जमावबंदी आदेश उल्लंघन, विनामास्क, दारूबंदी कायद्याचे उल्लंघन अशा स्वरुपाच्या कारवाया झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी परिस्थिती राज्यात कुठेही निर्माण झाली नाही.

चार भिंतीआड जल्लोष  

हॉटेलची वेळ रात्री ११ पर्यंतच असल्याने लोकांनी घरीच राहून कोरोना वर्षाला निरोप देणे पसंत केले. तरुणाईने फुलून जाणारे रस्ते नेहेमीचेच वाटत होते.  तळीरामांनीही मोजक्या मित्रांसोबत चार भिंतीच्या आड जल्लोष केला.

थर्टी फर्स्टचा उत्साह  पडला महागात

सार्वजनिक ठिकाणी ३१ डिसेंबर राेजी विनामास्क फिरणाऱ्या १३ हजार १७९ लोकांना वर्षाचा शेवटचा दिवस महागात पडला. नियम मोडणाऱ्या या लोकांकडून महापालिकेच्या पथकाने एका दिवसात तब्बल २६ लाख ३५ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. तर एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधीत एकूण १८ कोटी ८७ लाख ४८ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे. कोरोनापासून बचावासाठी तोंडाला मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

नागपुरात झिंगाट  तरुण-तरुणी ताब्यात

तुली इम्पेरियल या तारांकित हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा मारून मद्य, तसेच हुक्क्याच्या धुरात झिंगाट झालेल्या ६७ तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. पोलिसांचे आदेश झुगारून तुलीमध्ये मध्यरात्र उलटूनही धांगडधिंगा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी पहाटे २.३०च्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसह तेथे छापा मारला. यावेळी तेथे हुक्क्याचा धूर उडवत झिंगाट झालेल्या ६७ तरुण तरुणी पोलिसांना आढळल्या. बहुतांश धनिकबाळं होती. नंतर त्यांना सूचनापत्र देत सोडून देण्यात आले.

टॅग्स :नववर्षमुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस