Join us  

गुलाब-पुष्प देऊन मंत्रालयात स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा पत्राने महिलांना आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 12:34 PM

रविवार 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात येत आहे. यंदा रविवारी महिला दिन येत असल्याने मंत्रालयात

मुंबई - मंत्रालयात आज येणाऱ्या महिलांना जेव्हा अगत्यपूर्वक फुले आणि एक पत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मंत्रालायात अचानक झालेल्या या स्वागताचा सर्वच महिलांना सुखद धक्का होता. मुख्यमंत्री सचिवालयाचे कर्मचारी हसतमुखाने शुभेच्छा देऊन हे स्वागत करीत होते आणि महिलांच्या हाती एक पत्र देण्यात येत होते. हे पत्र चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे होते. त्यामुळे पत्र घेणाऱ्या महिलांना अधिकच आनंद झाला. महिला दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सन्मानार्थ हा स्वागतसोहळा आयोजित केला होता.

रविवार 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात येत आहे. यंदा रविवारी महिला दिन येत असल्याने मंत्रालयात आजच महिला दिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून मंत्रालयात महिलांचे स्वागत करताना, महिलांना एक पत्र देण्यात आले. त्यासोबतच, गुलाबाचे फुल देऊनही स्वागत झाले. या स्वागताने महिलांना अत्यानंद झाला. आपल्याला मिळालेले पत्र दाखवून इतर सहकाऱ्यांना दाखवत किंवा फोनवरुन नातेवाईकांना पाठवता महिलांनी हा स्वागत समारंभ इतरांसोबत शेअर केला. मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी महिला असोत किंवा आपल्या कामासाठी सरकारदरबारी पायऱ्या झिजवणाऱ्या नागरिक महिला असोत, या सर्वच वर्गातील महिलांचे स्वागत झाले.

  महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नारीशक्तीचा सन्मान करत, जागतिक महिला दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आनंदीबाई गोपाळ अशा अनेक थोर महिलांच्या कर्तृत्वाचा सुवर्णमय इतिहास आहे. नाविण्यपूर्ण काम करण्यासाठी हा इतिहास सदैव आपल्याला प्रेरीत करत असतो, असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी या पत्रावर लिहिला आहे. महाराष्ट्राच्या विकासात महिलांचे योगदान महत्वाचे असून तुमच्या सहकार्यामुळेच जनतेसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी यशस्वीपणे करू शकतो, असेही मंत्रालयातील कर्मचारी महिलांना उद्देशून म्हटले आहे.  

टॅग्स :मुंबईमंत्रालयमहिलाउद्धव ठाकरे