प्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:24 IST2019-01-24T04:23:53+5:302019-01-24T04:24:03+5:30

प्रियंका गांधी यांची काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याची घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

Welcome to the appointment of Priyanka Gandhi, enthusiasm among Congress workers | प्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह

प्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह

मुंबई : प्रियंका गांधी यांची काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याची घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. प्रियंका यांनी उत्तर प्रदेशची महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली असून त्यांच्या नेतृत्वाखाली या राज्यात पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे.
प्रियंका या काँग्रेसचा लोकप्रिय चेहरा आहे. त्यांची पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केल्याबद्दल प्रदेश उपाध्यक्ष व आमदार नसीम खान यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले. प्रियांका गांधी यांचे व्यक्तिमत्व, बोलण्याची शैली व कार्यकर्त्यावर असलेले त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे. त्यांच्यामुळे काँग्रेसला बळकटी मिळणार असून २०१९ ला आम्हीच सत्तेवर असा विश्वास खान यांनी व्यक्त केला. मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी जुहू येथे प्रियंका यांच्या नियुक्तीचा जल्लोष केला. प्रियंका यांनी उत्तर प्रदेशची महत्त्वाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल मिलिंद देवरा यांनी त्यांचे आभार मानले. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये मोठा उत्साह असल्याचा दावाही देवरा यांनी केला.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, प्रियंका गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्याचे आम्ही स्वागत करतो. ही त्यांची सुरुवात आहे. त्या इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात असे म्हटले जाते पण बरेचदा जसे दिसते तसे नसते. आता त्यांची सुरुवात आहे. त्या आव्हान उभ्या करू शकतील, का हे भविष्यात ठरेल.

Web Title: Welcome to the appointment of Priyanka Gandhi, enthusiasm among Congress workers