Join us  

केंद्राविरुद्ध राज्याचा मिठागराचा सत्याग्रह; कांजूरच्या कारशेडची विरोधामुळे कोंडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 9:16 AM

कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या नियोजित कारशेडला विरोध करत केंद्र सरकारने तेथील जमिनीवर दावा केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी बुधवारी कारशेडसाठी नव्या जागेचा शोध सुरू असल्याचे सांगितले होते.

मुंबई/ठाणे :  मुंबईतील मिठागरांच्या जमिनीवर पंतप्रधान आवास योजनेची घरे बांधण्याच्या केंद्राच्या प्रस्तावाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरूवारी विरोध केला. मुंबईतील पर्यावरणावर परिणाम होणार असल्याने तेथे इमारती बांधण्याची परवानगी गृहनिर्माण खाते कदापि देणार नाही, असे स्पष्ट करून त्यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या स्वप्नांना सुरुंग लावला. हा मुद्दा उचलून धरत मिठागरांच्या जागेवर कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नसल्याचे राज्याची भूमिका पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केली.

कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या नियोजित कारशेडला विरोध करत केंद्र सरकारने तेथील जमिनीवर दावा केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी बुधवारी कारशेडसाठी नव्या जागेचा शोध सुरू असल्याचे सांगितले होते. कारशेडवरून आघाडी सरकारची कोंडी झाल्याने त्याचा वचपा काढण्यासाठीच मिठागराच्या जमिनींवर घरे बांधण्यास विरोध करून राज्याच्या दोन मंत्र्यांनी जशास तसे भूमिका घेतल्याची चर्चा रंगली आहे.  मिठागरांच्या जागेवर घरांचा प्रस्ताव केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी राज्याला पाठविला होता. एमएमआरडीएने त्यानुसार आराखडेही तयार करायला घेतले. त्यासाठी एजन्सी नेमली. मात्र माझे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. मिठागरे ही केवळ मिठासाठी नसून, भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवण्याचे मोठे माध्यम आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आता महामुंबईच्या किनाऱ्यांना जाणवतो आहे. जर या मिठागरांवर घरे बांधली, तर तर हा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवेल. त्यामुळेच मिठागरांवर इमारती बांधू देणार नाही, असा आमचा निर्णय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून, तेही मिठागरांवर इमारती बांधू देणार नाही, या मताचे आहेत, असे आव्हाड म्हणाले.मुंबईसह महानगर प्रदेशातील मिठागरांच्या जागेवर परवडणारी घरे बांधण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू होती. यासाठीच्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने तीनदा मुदतवाढ द्यावी लागली. चौथ्या मुदतवाढीनंतर मात्र तीन कंपन्यांनी या कामात रस दाखविला. मात्र, आता मंत्री आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेमुळे या प्रकल्पाला खीळ बसण्याची चिन्हे आहेत.आव्हाड यांनी मिठागरांवरील बांधकामाला विरोध करणारे ट्विट सकाळी केले. मिठागरांची जागा मोकळी जागा घरबांधणीसाठी देऊ नका मुंबई आणि मुंबईकरांसाठी ते विनाशकारी ठरेल, असे त्यांनी म्हटले. यात आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी टॅग केले होते. त्यानंतर काही वेळात आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत मिठागरांवर निवासी अथवा व्यापारी बांधकामाला परवानगी दिली जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली. मिठागरांच्या जागा वगळली, तरी बांधकामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक जागा उपलब्ध असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.जितेंद्र आव्हाड म्हणाले...मिठागरे भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवण्याचे मोठे माध्यम आहे. जर या मिठागरांवर घरे बांधली, तर हा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवेल. त्यामुळेच मिठागरांवर इमारती बांधू देणार नाही. मुंबईकरांसाठी ते विनाशकारी ठरेल. 

आदित्य ठाकरे म्हणाले...मिठागरांवर कोणत्याही प्रकारच्या निवासी अथवा व्यापारी बांधकामाला परवानगी दिली जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली. मिठागरांच्या जागा वगळली, तरी बांधकामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक जागा उपलब्ध आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीजितेंद्र आव्हाडआदित्य ठाकरे