Join us

"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 19, 2025 12:19 IST

मुंबईकरांची पुढच्या २५ वर्षाची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला कालच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

मुंबई - मुंबई शहराच्या विकासात कायम स्वतःच्या अहंकारापायी, हट्टापायी खोडा घालणाऱ्या आमदार आदित्य ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिलेल्या गारगाई धरणाला विरोध केला तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा आज भाजपा नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. 

मुंबईकरांची पुढच्या २५ वर्षाची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला कालच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रो ३ चे काम स्थगित केले.त्याचबरोबर गारगाई धरण प्रकल्प सुद्धा रद्द केले. परंतू या सरकारने या प्रकल्पाला पुन्हा एकदा हिरवा कंदील दाखवल्याबद्दल आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मुंबई शहराच्या विकासात खोडा घालायचा, गारगाई धरण नको म्हणायचं आणि त्याचवेळेला मुंबईकरांच्या पाण्याच्या प्रश्नाचे काय? असा सवाल विचारायचा हा केवळ दुटप्पीपणा आणि राजकारण असल्याचा आरोप त्यांनी पत्रकाद्वारे केले आहेत. 

पर्यावरणाच्या नावाखाली खारे पाणी गोडे करण्याचा महागडा प्रकल्प मुंबईकरांच्या माथ्यावर घालायचा हे मुंबईकर सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराच्या हिताकरिता हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल “धन्यवाद देवेंद्रजी” अशी मोहीम कांदिवली पूर्व विधानसभेच्या नागरिकांच्या वतीने राबवण्यात येणार असल्याचे आमदार भातखळकर यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :अतुल भातखळकरमुंबईभाजपाआदित्य ठाकरेराजकारणदेवेंद्र फडणवीस