- महेश पवारमुंबई - मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत झगडणारच. मराठा आरक्षणाच्या लढ्यात गोळ्या घातल्या तरी विजयाशिवाय मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कोणीही हलणार नाही, असा निर्धार मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदान येथे व्यक्त केला.
आझाद मैदान परिसरात मनोज जरांगे पाटील यांचे सकाळी ९:३० वाजता आगमन झाले. मात्र, हजारो आंदोलकांच्या गर्दीतून त्यांच्या गाडीला वाट काढणे मुश्कील झाले होते. अखेर, १०च्या सुमारास ते आझाद मैदानात आले. मंचावर येताच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. श्री गणरायाच्या मूर्तीला हार घालून त्यांनी आंदोलकांना संबोधित करून उपोषणास सुरुवात केली. सरकारने सहकार्य न केल्याने मुंबईत जाऊन जाम करायचे ठरवले होते ते केले. पण, परवानगी देऊन सरकारने सहकार्य केल्यामुळे आम्हीही सहकार्य करू. मराठा समाजाला आरक्षणासाठी ७० वर्षे वाट पाहावी लागली हे कोणीही विसरू नये. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही, कोणीही इथून हलणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, असे सांगून ते म्हणाले, जे मैदान दिले तिथे झोपायचे. मी आझाद मैदानातच आहे. वाशी येथे आंदोलकांची सोय केली आहे. जाळपोळ, दगडफेक, अवाजवी गोंधळ तसेच मुंबईकरांना त्रास होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक आंदोलकाची आहे. पुढील दिशा ठरविण्यासाठी समाजाच्या एकजुटीची गरज आहे, असे ते म्हणाले.