We should also have one-sided power, the role played by the Congress leader Sachin Sawant | राज्यात एकहाती भगवा फडकवण्याच्या भूमिकेवर राष्ट्रवादीनंतर काँग्रेसनही मांडलं मत

राज्यात एकहाती भगवा फडकवण्याच्या भूमिकेवर राष्ट्रवादीनंतर काँग्रेसनही मांडलं मत

ठळक मुद्दे''आम्ही एका विशिष्ट परिस्थिती एकत्र आलो आहोत, भाजपाचं मोठं संकट आलं आहे. त्यामुळे, या संकटाचा सामना करण्यासाठी, हे भाजपाचं गडांतर आहे, तोपर्यंत आम्ही एकत्र आहोत, '' असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलय.

मुंबई - राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर, आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही आपली भूमिका मांडली. काँग्रेसही एकहाती सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सावंत म्हणाले. 

''आम्ही एका विशिष्ट परिस्थिती एकत्र आलो आहोत, भाजपाचं मोठं संकट आलं आहे. त्यामुळे, या संकटाचा सामना करण्यासाठी, हे भाजपाचं गडांतर आहे, तोपर्यंत आम्ही एकत्र आहोत, '' असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलय. उद्धव ठाकरे जे बोलले ते, त्यांची जी भूमिका आहे, त्यानुसार प्रत्येक पक्ष हा स्वप्न पाहत असतो, महत्वाकांक्षी असणे यात काही गैर नाही. आमचंही तेच स्वप्न आहे, आमचीही तीच महत्वकांक्षा आहे. एकहाती सत्ता काँग्रेसची आली पाहिजे, वर्षांनुवर्षे काँग्रेसचाच तिरंगा फडकत आहे. पण, आजच्या परिस्थितीत भाजपाच्या रुपाने जे संकट आहे, त्या स्थितीत आम्ही तिन्ही पक्ष मजबूत आहोत, 5 वर्षे हे सरकार चालेल, असा विश्वासही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केला. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना, विनायक मेटे हे देवेंद्र फडणवीस यांची स्क्रीप्ट वाचत असतात, ते स्वत:च काहीही बोलत नाहीत, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे. 

शरद पवारांनी कान टोचले

शरद पवार म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार कांदाप्रश्नी नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरु असलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. या बैठकीत जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचं कौतुकही केले. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करावं, सध्या आर्थिक निधीची कमतरता आहे मात्र लवकरच यावत तोडगा काढू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांना दिला. कोविड काळात राज्य सरकारने केलेली काम जनतेपर्यंत पोहचवा. शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ताकद देण्यात येईल असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दसरा मेळाव्यातही भाजपावर टीका

दरम्यान, दसरा मेळाव्यावेळी ऑनलाइन भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला होता. माय मरो पण गाय वाचो, असं आमचं हिंदुत्व नाही. इथं गोमाता आणि शेजारच्या गोव्यात खाता. असं आमचं हिंदुत्व नाही. पण घंटा बडवा, थाळ्या वाजवा इतकंच तुमचं हिंदुत्व आहे. फक्त काळ्या टोप्या घालू नका, त्याखाली मेंदू असेल तर  विचार करा, असा हल्लाबोल ठाकरे  यांनी केला होता. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा  होता. शिवाय, कोरोनासह राज्यात विविध  मुद्यांवरून सरू असलेल्या राजकीय  घमासानाबाबत ठाकरे काय  भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता होती. राज्यपाल-मुख्यमंत्री संघर्ष, जीएसटी, बिहारचं राजकारण, सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, कंगना राणौतवरून निर्माण झालेला वादंग अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी अत्यंत आक्रमक शैलीत समाचार घेतला. तर, मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाबाबतही नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: We should also have one-sided power, the role played by the Congress leader Sachin Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.