बांधकाम चालू ठेवूनही आम्ही प्रदूषण रोखले; मुंबईत सर्वच बांधकामांसाठी २९ मार्गदर्शक तत्त्वे जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 05:22 IST2025-02-17T05:20:54+5:302025-02-17T05:22:25+5:30
मुंबईच्या हवेत प्रदूषण वाढले की बांधकामे थांबवण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र बांधकाम न थांबवताही प्रदूषण नियंत्रणात आणता येते, हे मुंबई महापालिकेने स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले आहे.

बांधकाम चालू ठेवूनही आम्ही प्रदूषण रोखले; मुंबईत सर्वच बांधकामांसाठी २९ मार्गदर्शक तत्त्वे जारी
भूषण गगराणी
आयुक्त, मुंबई महापालिका
मुंबईच्या हवेत प्रदूषण वाढले की बांधकामे थांबवण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र बांधकाम न थांबवताही प्रदूषण नियंत्रणात आणता येते, हे मुंबई महापालिकेने स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले आहे. पावसाळ्यानंतर बांधकामे वेगाने सुरू होतात; त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावते, हे विविध पाहण्यांमधून समोर आले आहे. हवामानातील बदल त्यात भर टाकतात. अशा स्थितीत विकास प्रकल्प, बांधकामे यांचा वेग कायम राखायचा, नागरिकांची गैरसोय होऊ द्यायची नाही, वाहतूक सुरळीत ठेवायची, वायुप्रदूषणही नियंत्रणात आणायचे आणि हवामान बदलांना तोंड देऊ शकणाऱ्या उपाययोजनांचाही अवलंब करायचा, अशी सगळी एकत्रित कसरत महानगरपालिका प्रशासनाला करावी लागते आहे. घनदाट वसाहतींमध्ये, कोट्यवधी नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याला सर्वोच्च प्राथमिकता देताना अर्थव्यवस्था व पायाभूत सुविधांचा कणा कायम राहील, याचाही ताळमेळ साधावा लागतो. ते करताना प्रशासनाची कसोटी लागते.
पावसाळ्यात येणाऱ्या मर्यादा लक्षात घेतल्या तर बांधकामे वेगाने करण्यासाठी वर्षातून आठ महिन्यांचा कालावधी मिळतो. त्यातही वायुप्रदूषणाच्या निर्बंधांखाली बांधकामे आली तर त्याचा मोठा फटका या प्रकल्पांना तर बसतोच; त्यासोबत त्याचे लाभार्थी असलेल्या नागरिकांना आणि अर्थव्यवस्थेलादेखील त्याचा तोटा सहन करावा लागतो. देशातील अनेक नागरी भागांना वायुप्रदूषणाचा अत्यंत मोठा फटका बसला आहे. त्या सर्वांच्या तुलनेत मुंबईने सक्त उपाययोजना करून प्रदूषणावरही नियंत्रण मिळवले आणि बांधकामे व प्रकल्पांना आडकाठी येणार नाही, याची योग्य काळजी घेतली आहे.
वायुप्रदूषणातील प्रमुख घटक म्हणजे म्हणजे मुंबईमध्ये विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांतून, पायाभूत प्रकल्पांच्या कामांमधून निर्माण होणारी धूळ. मुंबई महानगरांत इमारती बांधकामे, इमारती पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे. विविध ४८ प्राधिकरणांकडून या महानगरात सातत्याने कामे सुरू असतात. पायाभूत सुविधांचा विचार करता, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून भूमिगत मेट्रोचे विस्तीर्ण जाळे उभे केले जात आहे. महानगरपालिकेसह एमएमआरडीए, एमएसआरडीसी, रेल्वे, आदी प्राधिकरणांकडून प्रकल्प राबवले जात आहेत.
रस्ते, पूल, मेट्रो, बुलेट ट्रेन, इमारतींचा पुनर्विकास आणि इतर बांधकामे तसेच अन्य पायाभूत सुविधांची ही सगळी कामे एकाच वेळी होताना आढळतात. साहजिकच, मुंबईचा चेहरामोहरा बदलत असताना, इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. असे परिणाम रोखण्यासाठीच उपाययोजनांची अंमलबजावणी होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.
बांधकाम इमारतींना हिरवे कापड, ताडपत्री, ज्यूटने पूर्णपणे झाकून बंदिस्त करणे बंधनकारक.
कोणतेही बांधकाम पाडताना वरपासून खालपर्यंत संपूर्णत: ताडपत्री / हिरवे कापड / ज्यूट शीटने झाकणे, प्रत्यक्ष पाडकाम करतेवेळी सातत्याने पाणी शिंपडणे किंवा फवारणी करणे आवश्यक.
बांधकाम किंवा पाडकामाच्या ठिकाणी तसेच बांधकाम साहित्य चढवताना आणि उतरवताना सातत्याने पाण्याची फवारणी करणे.
बांधकामावर प्रदूषण निरीक्षण प्रणाली आवश्यक.
धूळनियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे. सेन्सर आधारित वायुप्रदूषण संनिरीक्षण प्रणाली तैनात करणे.
राडारोडा वाहून नेणारी वाहणे पूर्णपणे झाकणे. वाहनांच्या चाकांवर पाणी फवारणी करून ती स्वच्छ करणे.
बांधकाम प्रकल्पाची नियमित तपासणी करणे व धूळ नियंत्रित न करणाऱ्यांवर कारवाई करणे.
धूळ नियंत्रणासाठी स्मॉग गन आणि वॉटर स्प्रिंकलर्स यांचा वापर करणे.
बांधकाम प्रकल्पांभोवती ३५ फूट उंचीचे धातूचे पत्रे किंवा आच्छादन उभारणे अनिवार्य.
एक एकरापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांभोवती किमान ३५ फूट उंचीचे, तर एका एकरापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान २५ फूट उंचीचे पत्रा / धातूचे आच्छादन लावणे.
अंमलबजावणी न करणाऱ्यांवर काम थांबवण्याची नोटीस देणे किंवा कामाचे ठिकाण सील करणे, यांसारखी कठोर कारवाई तत्काळ करणे.
आठ वर्षांहून अधिक जुन्या, अवजड डिझेल वाहनांना मुंबई कार्यक्षेत्रात वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे.
क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राउंड) आणि कचरा जाळण्याच्या संभाव्य ठिकाणी कुठेही उघड्यावर कचरा जाळण्यावर पूर्णपणे बंदी.