मराठीला प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी हवेत; तरुणांनी मांडल्या भावना; जाहीरनाम्यात स्थान हवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:01 IST2025-12-27T10:01:07+5:302025-12-27T10:01:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतील वस्त्यांमध्ये किमान सुविधा पुरविणारे आणि मराठी संस्कृतीचे अस्तित्व टिकवणारे, रोजगार आणि महिलांच्या प्रश्नांवर ...

मराठीला प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी हवेत; तरुणांनी मांडल्या भावना; जाहीरनाम्यात स्थान हवे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील वस्त्यांमध्ये किमान सुविधा पुरविणारे आणि मराठी संस्कृतीचे अस्तित्व टिकवणारे, रोजगार आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करणारे लोकप्रतिनिधी हवेत, अशी भूमिका महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन तरुणांनी मांडली. राजकीय पक्षांनी कोणत्या मुद्द्यांना निवडणुकीच्या जाहीरनाम्यात स्थान द्यावे याबाबतही विद्यार्थ्यांनी त्यांची मते व्यक्त केली.
मुंबई शहरातील वाढते प्रदूषण, वाहतुकीची समस्या यावर उपाययोजना काढू शकणारे प्रतिनिधी शहराला हवे आहेत, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. या शहराला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळण्यासाठी ते अधिक सुंदर बनविण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली.
मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छ आणि पुरेसे पाणी येत नाही. रस्त्यांवर खड्डे ही नित्याचीच बाब झाली आहे. वस्त्यांतील स्वच्छतागृहांची स्थिती विदारक आहे. पालिका निवडणुकीत राजकीय पक्षांनी या स्थानिक प्रश्नांवर भूमिका मांडायला हवी. स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट द्यावे. बाहेरचे उमेदवार लादू नयेत.
अमन पठाण,
एमए प्रथम वर्ष, मुंबई विद्यापीठ
शिक्षण, रोजगार, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता व सुरक्षितता यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाय अपेक्षित आहेत. त्यामुळे ही निवडणूक शहराच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाची आहे.
ऋतिक डोईफोडे,
द्वितीय वर्ष, एलएल.एम., ठाकूर कॉलेज
शहराच्या संस्कृतीत स्थानिक समुदायाच्या भाषेचे आणि संस्कृतीचे महत्त्व असते. मात्र मुंबईत मराठी भाषेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मराठीच्या मुद्द्यावर कोणते राजकीय पक्ष किती गांभीर्याने जाहीरनामा मांडतात त्याकडे लक्ष आहे.
साहिल जाधव,
एमए द्वितीय वर्ष, मुंबई विद्यापीठ
स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्या तरुणांना संधी द्यावी. हे तरुण उच्चशिक्षित आणि सर्वसामान्य कुटुंबातील असावेत. त्याचबरोबर ते घराणेशाहीतील नसावेत. उद्याने, खेळाची चांगली मैदाने निर्माण केली जावीत.
रुची तिवारी,
प्रथम वर्ष, एमए, सेंट झेवियर्स कॉलेज