Join us  

आम्ही दिलेला शब्द पाळला, 'आरे'च्या निर्णयानंतर आव्हाड म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 11:01 AM

मेट्रो कारशेड आरेच्या जमिनीवर होणार नाही याचा उच्चार मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात एका बैठकीत केला होता. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे, असे त्यांनी आजच्या बैठकीत स्पष्ट केले.

ठळक मुद्देमेट्रो कारशेड आरेच्या जमिनीवर होणार नाही याचा उच्चार मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात एका बैठकीत केला होता. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे, असे त्यांनी आजच्या बैठकीत स्पष्ट केले

मुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी मेट्रो ३ साठी कोणत्याही परिस्थितीत कारशेड होणार नाही हे स्पष्ट झाले. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन, आम्ही शब्द पाळला, असे म्हटले आहे. आरे जंगल वाचविण्यासाठी आम्ही तुरुंगात गेलो, पण आधीचे सरकार नमले नसल्याची आठवणही आव्हाड यांनी करुन दिली. 

मेट्रो कारशेड आरेच्या जमिनीवर होणार नाही याचा उच्चार मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात एका बैठकीत केला होता. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे, असे त्यांनी आजच्या बैठकीत स्पष्ट केले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, दुग्धविकास मंत्री सुनील केदार वन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. 

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन आमच्या सरकारने शब्द पाळल्याचे म्हटले. तसेच, आपण या आंदोलनावेळी तुरुंगात गेलो होतो, याची आठवणही त्यांनी करुन दिली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे अभिनेता फरहान अख्तरनेही स्वागत केले. वेलकम ए डिसीजन असे ट्विट करुन फरहानने मुख्यमंत्र्यांचे ट्विट रिट्विट केले आहे. एकंदरीत वृक्षप्रेमींना या निर्णयाचा आनंद झाला असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनीही या निर्णयासाठी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, आदित्य ठाकरेंचा आरेच्या वृक्षतोडीला विरोध होता. 

आदिवासींचे हक्क अबाधित

राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. राखीव वन क्षेत्राबाबत ४५ दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील.त्या सूचना व हरकती ऐकून घेऊन त्यानुसार वनामधून वगळायचे क्षेत्र निश्चित करण्यात येईल. सर्व प्रकारची बांधकामे, रस्ते, झोपड्या आणि आदिवासी पाडे तसेच इतर शासकीय सुविधा या पहिल्या टप्प्यातून वगळण्यात येतील. त्याचबरोबर येथील झ।ोड्पुनर्वसनही तातडीने सुरू केले जाईल. या संपूर्ण कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव हा वन विभागामार्फत लवकरच सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरे येथील वनसंपदा संरक्षित होणार आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाजितेंद्र आव्हाडआरे