Join us

कोर्टाची तारीख मिळते पण तुमची काही येत नाही; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 05:59 IST

राज्यभरात किती सिटी स्कॅन, एमआरआय मशीन कमी आहेत, त्याची आकडेवारी अधिवेशन संपण्याआधी सभागृहाला द्या, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एकपरी कोर्टाची तारीख लगेच मिळते, पण शासकीय वैद्यकीय रुग्णालयांसाठी उपकरणांच्या खरेदीची तारीख काही येत नाही. तेव्हा राज्यभरात किती सिटी स्कॅन, एमआरआय मशीन कमी आहेत, त्याची आकडेवारी अधिवेशन संपण्याआधी सभागृहाला द्या, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. 

मूळ प्रश्न काँग्रेसचे साजित पठाण यांनी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय ३ टेस्ला मशीनची खरेदी २०१७ पासून रखडली असल्याचे सांगत खरेदी कधी करणार, असा प्रश्न केला. त्यावर, तीन वेळा निविदा काढूनही कोणीही ती भरली नाही. त्यामुळे विलंब झाला. आता अधिकची २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, लवकरच खरेदी केली जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले. 

याआधी एमआरआय मशीनच्या खरेदीसाठी सरकारने १० कोटी ९० लाख रुपये इतका निधी दिला होता. पण, तो खरेदीअभावी परत गेला, याची कबुली मंत्री मुश्रीफ यांनी दिली. राज्यभरातील सात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमआरआयसह विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. हरिश पिंपळे, विजय वडेट्टीवार, अजय चौधरी आदींनी उपप्रश्न विचारले.

 

टॅग्स :विधानसभाराहुल नार्वेकरहसन मुश्रीफ