मुंबई : एकीकडे गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत गृहविक्रीने जोर पकडला असला तरी दुसरीकडे जवळपास ८१ टक्के लोकांनी मुंबईत घर घेणे परवडत नसल्याची माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या अॅनारोंक कंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ऑनलाइन पद्धतीने ८,२५० लोकांच्या प्रतिक्रिया जाणून त्याचे विश्लेषण करत हे सर्वेक्षण सादर केले आहे.
सर्वेक्षणानुसार, देशाच्या कोणत्याही भागापेक्षा लोकांची मुंबईला सर्वाधिक पसंती आहे. मात्र, मुंबईमध्ये असलेली जागेची (भूखंडाची) कमतरता, बाहेरून येत मुंबईत स्थायिक होणाऱ्या लोकांची वाढती संख्या आणि पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यान्वित होत असल्यामुळे मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडत आहेत.
या सर्वेक्षणानुसार, ज्या घरांची किंमत ४५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा घरांच्या खरेदीमध्ये १७ टक्के लोकांना रस आहे. मात्र, चालू महिन्याच्या पहिल्या सहामाहीत परवडणाऱ्या दरातील घरांचे केवळ १२ टक्के प्रकल्पच मुंबईत कार्यान्वित झाले आहेत.
६२ टक्के लोकांना जी घरे उपलब्ध आहेत तो पर्याय नको आहे. ९२ टक्के लोकांना ज्या विभागात घर हवे आहे, त्या विभागात ते मिळत नसल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
दर वाढले; कुणाला कसे घर परवडते?
ज्या घरांची किंमत २० लाख ते दीड कोटी रुपयांच्या दरम्यान आहे, अशा घरांच्या खरेदीसाठी ३६ टक्के लोक उत्सुक आहेत. मात्र, पुन्हा कोणता विभाग आणि घराचे आकारमान या मुद्द्यावरदेखील त्यांनी लक्ष वेधले आहे. ४५ लाख ते ९० लाख रुपये किमतीच्या घरांची खरेदी करण्यात २५ टक्के लोकांना रस आहे.